नागपूर – गोवा शक्तिपीठ एक्स्प्रेस-वे : राज्य सरकारकडून मंजुरी; DPR साठी 3 निवीदा, पहा 760Km लांबीचा हा महामार्ग ‘या’ 12 जिल्ह्यांतून जाणार…
महाराष्ट्राच्या दळणवळणात क्रांती घडवण्यासाठी समृद्धी महामार्गानंतर राज्य सरकारने नागपूर – गोवा ग्रिनफिल्ड द्रुतगती महामार्ग बांधण्यासाठी मंजुरी दिली आहे. हा एक्स्प्रेसवे 760 किमी लांब असून त्याद्वारे महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांसह राज्यातील साडेतीन शक्तीपीठांनाही जोडला जाणार आहे. यामुळे या मार्गाला शक्तिपीठ एक्स्प्रेसवे असे नाव देण्यात आले आहे.
चालू वर्षात शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे. समृद्धी महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प या नावाने हा आणखी एक मोठा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे
एमएसआरडीसीने त्यानुसार सल्लागार नेमण्यासाठी गेल्या आठवड्यात ‘डीपीआर’ तयार करण्यासाठी 3 कंपन्यांकडून निवीदा आल्या आहेत. एल. एन. मालविया इन्फ्रा, मोनार्क सर्वेयर्स आणि टीपीएफ इंजिनियरिंग या 3 कंपन्यांचा समावेश आहे.
ही निविदा प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सल्लागाराची निवड केली जाईल. त्यानंतर सल्लागाराकडून आराखडा तयार करून मंजूर केला जाईल. पुढे बांधकामाची निविदा निघेल आणि प्रत्यक्ष काम सुरू होईल प्रयत्न आहे.
काम सुरू झाल्यापासून ते काम पूर्ण होण्यासाठी पाच ते सात वर्षे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुसाट मागोवरून नागपुरातून गोव्याला जाण्यासाठी नागरिकांना किमान 2028-29 पर्यंत प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.
नागपूर – गोवा जोडणाऱ्या मार्गामुळे या शहरांसह या मार्गावरील इतर शहरांमधील व्यापार वाढण्यास मदत होईल. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला गोव्याचे पर्यटन क्षेत्र जोडले जाऊन येथील तीर्थक्षेत्रांच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे.
शक्तिपीठ एक्स्प्रेसवेमुळे नागपूर – गोवा प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. हा प्रवास 21 तासांवरून 8 तासांवर येणार आहे. नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गामध्ये समाविष्ट नसलेले विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग या एक्स्प्रेसवेमध्ये समाविष्ट केले जाणार आहे.
महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि पत्रादेवी या तीन शक्तिपीठांना जोडल्यामुळे नागपूर ते गोवा द्रुतगती मार्गाला शक्तिपीठ (शक्तीचे आसन) असे नाव देण्यात आले आहे.
कसा असणार हा प्रोजेक्ट, किती येणार खर्च :-
एकूण अंदाजित खर्च : 75000 कोटी
प्रकल्पाची लांबी: 760 किमी
लेन : 6
साईझ : 100 मी
स्थिती : डीपीआर तयारी
ओनर : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लिमिटेड (MSRDC)
प्रकल्प मॉडेल : अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (EPC)
राज्यातील 12 जिल्हे जोडणार..
या महामार्गामुळे राज्यातील 12 जिल्हे जोडले जाणार आहेत. यामध्ये वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे.
नंतर पुढे हा महामार्ग महाराष्ट्र – गोवा सीमेवर कोकण एक्सप्रेसला जोडला जाणार आहे. या एक्स्प्रेसवेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवासाचा वेळ सध्याच्या 21 तासांच्या प्रवासाहून सुमारे 8 तासांपर्यंत कमी होणार आहे.