केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे या योजनेचा पहिला हप्ता 26 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. शिर्डी येथील नियोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हप्त्याचे वितरण केले जाणार असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहे.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच राज्य सरकारच्या वतीने देखील नमो शेतकरी महासन्मान योजनेंतर्गत वार्षिक 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. त्याप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी 1720 कोटी रुपयांच्या निधी वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली होती.
मात्र महाआयटीने लावलेल्या विलंबामुळे आणि कृषी विभागाने पडताळणीत केलेल्या दिरंगाईमुळे नमो शेतकरी योजनेच्या वितरणास विलंब होत होता. पी.एम. किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात राज्याच्या या योजनेचे पैसे वितरित करण्यात येणार, असे सांगितले जात होते.
मात्र कृषी विभागाने ऑगस्टपासून विशेष मोहीम राबवत पुन्हा पडताळणी केली असता यात 7 लाख 41 हजार शेतकऱ्यांची भर पडली. केंद्र सरकारचा 14 वा हप्ता 85.60 लाख शेतकऱ्यांना मिळाला होता. मात्र नवीन अभिलेखांची तपासणी केल्यानंतर राज्यातील पात्र लाभार्थ्यांची संख्या 93.07 लाख झाली आहे.
वास्तविक केंद्र सरकारचा 14 वा हप्ता 85.60 लाख शेतकऱ्यांना देण्यात आला होता. त्यापोटी 1866 कोटी 40 लाख वितरित करण्यात आले होते. सध्या राज्य सरकारने नमो महासन्मान शेतकरी योजनेसाठी 1720 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
पीएम किसान योजनेतील पात्र 1 कोटी 18 लाख शेतकऱ्यांची छाननी केल्यानंतर मोठ्या प्रमाणात बोगस प्रकरणे आढळली होती. त्यामुळे केंद्र सरकारचा 13 वा हप्ता 81.13 लाख लाभार्थ्यांना, तर 14 वा हप्ता पडताळणीनंतर 85.60 लाख शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला होता.