पुणे आणि पिंपरी – चिंचवड महापालिकेनंतर आता आणखी एका महापालिकेची चर्चा सामाजिक – राजकीय वर्तुळात सुरू झाली असून 3 नगरपरिषदांची स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करण्यासंदर्भात, राज्य शासनाने विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे अहवाल मागवला आहे.
या संदर्भात, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हाधिकारी, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे आयुक्त, PCMC आणि PMC आयुक्त आणि चाकण, आळंदी, राजगुरू नगरपालिकेचे अधिकारी यांना अहवालांबाबतचे आदेश देण्यात आले असून त्यानुसार कामही सुरु झाले आहे.
चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद, राजगुरुनगर नगरपरिषद आणि त्यांच्या आजूबाजूची गावे एकत्र करून महानगरपालिका स्थापन केली जाणार आहे. याबाबतचा अहवाल राज्य सरकारने विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून अभिप्रायासह मागवला आहे..
पिंपरी – चिंचवड ही उद्योगनगरी असल्याने राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून कामगार वर्ग शहरात नोकरीसाठी स्थायिक झाला आहे. त्यामुळे शहराचे झपाट्याने नागरीकरण होत असल्याने पिंपरी – चिंचवडची लोकसंख्या 30 लाखांच्या घरात पोहोचली आहे.
याआधी चाकण, देहू, आळंदी, म्हाळुंगे, मोई, निघोजे, कुरूळी, नाणेकरवाडी, खराबवाडी, कडाची वाडी, चिंबळी, केळगाव, खालुंब्रे, गहुंजे ही गावे या गावांचापिपरी – चिंचवड लागत असणाऱ्या शहरांना पालिकेत सामावून घेण्याबाबत शासन विचारधीन होते.
परंतु आधीच पुणे आणि पिंपरी – चिंचवड महापालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात गावांचा समावेश करण्यात आला असून दोन्ही महापालिकांच्या हद्दवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे PMC आणि PCMC अंतर्गत अधिक गावांचा समावेश करणे आता योग्य होणार नाही. चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद आणि राजगुरु नगरपरिषद त्यांच्या लगतच्या गावांचा समावेश करून नवीन महापालिका स्थापन करण्याची मागणी होत आहे.
त्यानुसार या तिन्ही नगरपरिषद हद्दीतील भागांसह आजूबाजूच्या गावांचे एकूण क्षेत्रफळ, लोकसंख्या, हद्द याचा तपशिल घेण्यास सुरुवात झाली आहे.