राज्यात Omicron चा खतरा..! साताऱ्यातही Omicron ची एंट्री, 8 नवे रुग्ण आढळले ; एकूण रुग्णसंख्या 48 वर…
शेतीशिवार टीम, 18 डिसेंबर 2021:- कोरोना आणि त्याचा नवा व्हेरियंट Omicron मुळे पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. देशभरातून सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळत असून त्याचं प्रमाण सातत्याने वाढत आहे.
ताज्या अपडेटबद्दल बोलायचं झालं तर, आज राज्यात ओमिक्रॉनची आणखी 8 नवे रुग्ण आढळले असून यापैकी 4 रुग्ण मुंबई विमानतळ पर्यवेक्षण विभागात, 3 सातारा आणि 1 रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रात आढळला असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.
यासह राज्यातील Omicron रुग्णांची संख्या 48 वर पोहोचली आहे. यापैकी 28 रुग्णांना RT PCR टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
परिस्थिती पाहता अनेक राज्यांमध्ये कडक कारवाई सुरू झाली आहे. या नव्या संकटामुळे मुंबई महानगरपालिकेने आगामी 25 डिसेंबर म्हणजेच ख्रिसमस डे आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनबाबत काही विशेष गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.त्या खालीलप्रमाणे…
बंदिस्त सभागृहांमध्ये आयोजित होणारे कोणतेही कार्यक्रम / समारंभ / उपक्रम या ठिकाणी, त्या सभागृहाच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के व्यक्तिंनाच उपस्थितीची परवानगी आहे.
मोकळ्या / खुल्या जागेत होणाऱ्या कार्यक्रम / समारंभ / उपक्रमासाठी सदर जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के एवढ्याच संख्येने उपस्थितीला परवानगी असणार आहे
मात्र, खुल्या / मोकळ्या जागेतील कोणत्याही आयोजनात एक हजारापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणार असतील तर, त्या संदर्भात स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला आगावू सूचना देऊन त्याबाबतची पूर्व मंजुरी प्राप्त करणे अत्यावश्यक आहे.
सर्व हॉटेल्स्, उपहारगृह, सिनेमागृह, इतर सर्व शासकीय व खासगी आस्थापना आदी सर्व ठिकाणी उपस्थितींच्या नियमांसह कोविड प्रतिबंधात्मक निर्देशांचे सक्तीने पालन करण्यात यावे.
सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेऊन आपले लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह इतर सार्वजनिक ठिकाणी देखील कोविड लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच योग्य ती मुभा असेल. अन्यथा नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी / आस्थापनांमध्ये कार्यरत सर्व मनुष्यबळाचे तसेच कार्यक्रम / समारंभांमध्ये सर्व उपस्थितांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. त्याचे उल्लंघन केल्याचे आढळले तर संबंधित आस्थापनांवर नियमानुसार योग्य ती दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
मास्क चा योग्यरितीने वापर करणे, हातांची नियमित स्वच्छता राखणे आणि सुरक्षित अंतर राखणे, सर्व परिसर / खोल्या /प्रसाधनगृहे यांची वेळोवेळी स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करणे यासह कोविड प्रतिबंधक सर्व बाबींचे प्रत्येक नागरिकाकडून काटेकोर पालन करण्यात यावे.
नाताळ (ख्रिसमस), नवीन वर्ष स्वागतासाठी पार्ट्यांचे आयोजन करणे टाळावे, समारंभांमध्ये गर्दी करु नये, कोविड प्रतिबंधात्मक वर्तन राखावे, असे आवाहन पुनश्चः एकदा इकबाल सिंह चहल यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे.