पशुसंवर्धन योजना 2023: गाईसाठी 70 हजार तर म्हशीसाठी 80 हजारांचे अनुदान ! शेळी – मेंढी, गाय-म्हशी, कुक्कुट गट वाटपासाठी असा करा अर्ज..
पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांसाठी पशुपालक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी 8 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे. नावीन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गायी – म्हशींचे गटवाटप करणे, शेळी – मेंढी गटवाटप करणे, 1 हजार मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसाह्य देणे, 100 कुक्कुट पिल्लांचे वाटप व 25 आणि 253 तलंगा गटवाटप या योजनांसाठी ऑनलाइन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया 2023-24 या वर्षात राबविली जाणार आहे.
संकेतस्थळावर किंवा ‘AH.MAHABMS’ मोबाइल अँपद्वारे अर्ज करावा. अर्ज करताना दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन किंवा शेळीपालन यापैकी स्वतंत्रपणे निवड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत. अर्ज भरताना नोंदविलेल्या मोबाइल क्रमांकावरच अर्जाच्यास्थितीबाबतचे संदेश पाठविले जाणार असल्याने अर्जदाराने कोणत्याही स्थितीत मोबाइल क्रमांक बदलू नये.
अर्जदाराने एखाद्या योजनेकरिता एकदा अर्ज केल्यानंतर दर वर्षी पुन्हा अर्ज करावा लागू नये यासाठी तयार केलेली प्रतीक्षा यादी पुढील पाच वर्षांपर्यंत लागू ठेवण्याची सोय केलेली आहे. त्यामुळे यापूर्वी अर्ज केलेल्या प्रतीक्षा यादीतील अर्जदारांनाही नव्याने अर्ज न करता योजनेचा लाभ मिळू शकणार आहे.
योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पद्धती याबाबतचा संपूर्ण तपशील या संकेतस्थळावर तसेच मोबाइल अँपवर उपलब्ध आहे. या संगणकप्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असल्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता मोबाइलचा जास्तीत जास्त वापर करावा.
अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाइल क्रमांकावर अजांच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार आहेत. तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघू पशुवैद्यकीय – सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी केले आहे.
कुठे कराल अर्ज ?
या योजनेची पूर्ण माहिती व अर्ज सादर करण्याची कार्यपध्दती याबाबतची संपूर्ण डिटेल्स https://ah.mahabms.com ( AH-MAHABMS ) संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
गाय – म्हशींच्या गटवाटपासाठी असे मिळणार अर्थसहाय्य..
या गाय – म्हशींचे होणार वाटप..
या योजनेमध्ये प्रतिदिन 10 ते 12 लिटर दूध उत्पादन देणाऱ्या एच एफ, जर्सी या संकरित गायी, प्रतिदिन 8 ते 10 लिटर दुध उत्पादन देणाऱ्या गीर, सहीवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर, प्रति दिन 5 ते 7 लिटर दुध उत्पादन देणाऱ्या देवणी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी गायी तसेच, मुन्हा व जाफराबादी या सुधारित जातीच्या म्हशी वाटप करण्यात येतील.