शेतीशिवार टीम, 15 जानेवारी 2022 : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीनंतर आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी अजितदादांची बैठक पार पडली. या पदासाठी शिरूरचे आ. अशोक पवार, आ. दिलीप मोहिते पाटील, माजी आ. रमेश थोरात, प्रा. दिंगबर दुर्गाडे, सुनील चांदेरे यांची नवे चर्चेत होती.
आज बैठकीत अजितदादांनी सर्वाना धक्का देत राष्ट्रवादीच्या प्रा. दिंगबर दुर्गाडे यांचं नाव निश्चित केलं आहे. दिंगबर दुर्गाडे यांनी यापूर्वी देखील जिल्हा बँकेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. तर उपाध्यक्षपदासाठी सुनील चांदेरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी आज सकाळी जिल्हा बॅंकेच्या मुख्य शाखेत सर्व नवनिर्वाचित संचालकांना आमंत्रित करण्यात आलं होते. जवळपास 1 तास चाललेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्री आणि जिल्हा बँकेचे संचालक अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्व संचालकांशी चर्चा करून प्रा. दिगंबर दुर्गाडे आणि सुनील चांदेरे यांची नवे निश्चित केली.
पुणे जिल्हा बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे. मागील अनेक वर्षांपासून या बॅंकेवर अजित पवार यांचीच एकहाती सत्ता आहे. अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिल्हा बॅंकेतून केली होती. 1991 पासून अजित पवार जिल्हा बॅंकेत आहेत. आतापर्यंत त्यांनी सात वेळा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा मान भूषवला आहे.