भोर तालुक्यातील कांजळे, केळवडे, कांबरे, खोपी, नायगाव ही गावे रिंगरोड प्रकल्पातून वगळली असून, सातबारा उताऱ्यावरील ‘रिंगरोड राखीव’ नोंद रद्द करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहेत. त्यामुळे रिंगरोडविरोधी कृती समितीच्या लढ्याला यश आले आहे.
पुण्याच्या पश्चिम भागातील रिंगरोडसाठी भोर तालुक्यातील रांजे, कुसगाव, खोपी, कांजळे, केळवडे, कांबरे, नायगाव ही गावे बाधित होती. येथील जमिनींच्या सातबारा उताऱ्यावरील रिंगरोडची राखीव, अशी नोंद रद्द करण्याची नोटीस नुकतीच निघाली.
या पार्श्वभूमीवर भोर येथे पाच गावांतील शेतकऱ्यांनी आमदार संग्राम थोपटे यांचा सत्कार केला. छत्रपती संभाजीनगर महामार्गाला पुणे रिंगरोडचा तुकडा जोडताना शिवरे गावातील बागायती जमिनींमधून केलेल्या आखणीलाही कृती समितीसह आमदारांनी विरोध केला आहे. ते क्षेत्र वाचवण्यासाठी बोगदा करण्याची व पुणे – बंगळुरूच्या नव्या आखणीत भोर तालुक्यातील खोपी ते राजापूर पांडे या पट्ट्यातील 22 गावे बाधित होत असून, तीदेखील रद्द करण्याची आग्रही मागणी केली. पर्यायी मार्गसुद्धा दिला आहे.
बातमी : Ring Road : हेक्टरी 6 कोटी 11 लाखांचा मोबदला, पहा गावनिहाय असे आहेत दर..
भोर तालुक्यातील खोपी, केळवडे, कांजळे, कांबरे व नायगाव या गावांतील क्षेत्र रिंगरोड पश्चिममधून वगळण्याचा निर्णय झाला असून, या पाच गावांतील सातबारा उताऱ्यावरील रिंगरोडच्या इतर हक्कातील नोंदी रद्द करण्याचे आदेश संबंधित तलाठी व मंडलाधिकाऱ्यांना दिले आहेत.
– राजेंद्र कचरे, प्रांताधिकारी, भोर
आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांवरील अन्याय दूर झाला. तरी दोन बोगदे न करता पिकाऊ जमिनीतून आखणी केल्याने रांजे, कुसगाव, रहाटवडे ही गावे खासगी कंपनीच्या बांधकाम खर्च वाचविण्याच्या धोरणामुळे वाचवू शकलो नसल्याची खंत आमदारांनी व्यक्त केली.
– श्यामसुंदर जायगुडे, अध्यक्ष, रिंगरोडविरोधी कृती समिती