अनेक वर्षांपासून राज्यातील सुशिक्षित बेरोजगार शिक्षकभरतीची वाट बघत होते. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था शाळांसह खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकभरती आता ‘पवित्र’मधूनच होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात 15 ऑगस्टपासून शिक्षकभरतीला सुरुवात होणार आहे. (शिक्षक भरती : 2023)
स्वातंत्र्यदिनीच भरतीचे ‘पवित्र’ पोर्टल सुरू होईल. पहिल्या टप्प्यात 30 हजार रिक्त पदे भरण्याचे जाहीर केले आहे. पण, सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक व संचमान्यतेत अतिरिक्त झालेल्या शिक्षकांमुळे भरतीतील पदे कमी होतील, अशी वस्तुस्थिती आहे.
जिल्हा परिषद महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या शाळासह खासगी अनुदानित शाळांमध्ये सद्य:स्थितीत 64 हजार शिक्षकांची कमतरता आहे. त्यासाठी खासगी संस्थांना त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती (जाहिरात) बिदुनामावलीसह त्याठिकाणी अपलोड करावी लागणार आहे.
त्यानंतर त्या शाळेमध्ये राज्य पातळीवरूनच एका जागेसाठी तीन उमेदवार पाठविले जातील. त्यांची मुलाखत घेऊन संस्थेने एकाची निवड करायची आहे. त्यामुळे खासगी संस्थाचालकांची मनमानी कायमची थांबणार आहे.
‘सेवानिवृत्त’मुळे भरतीतील पदे होणार कमी..
राज्यातील जवळपास 15 हजार शाळांची पटसंख्या 10 व 20 पर्यंतच आहे. अशा द्विशिक्षकी शाळा बंद करण्याऐवजी त्याठिकाणी सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक करण्यासाठी ‘शिक्षण सारथी’ योजना सुरू केली आहे. त्यानुसार 70 वर्षांपर्यंतच्या सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक करण्याचा शासन निर्णय झाला आहे. या 12 ते 15 हजार सेवानिवृत्त शिक्षकांमुळे नव्याने होणाऱ्या भरतीत पदांची संख्या कमी होऊ शकते, असे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. आता संचमान्यता पूर्ण होताच भरतीला सुरुवात होणार असून, तत्पूर्वी बिंदूनामावलीची प्रक्रिया पूर्ण होईल.
निवड मेरिट यादीनुसारच..
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील उमेदवारांची निवड मेरिट यादीनुसार आणि ‘टेट’ व ‘सीएआयटी’ चाचणीतील गुणांवरून होणार आहे. त्यासाठी त्यांना 15 सप्टेंबर या कालावधीत जिल्हा, जातप्रवर्ग, विषयाचा प्राधान्यक्रम पवित्र पोर्टलवर भरावा लागणार आहे.
तत्पूर्वी या उमेदवारांना पोर्टलवर नोंदणी करून घ्यावी लागेल. 10 ऑक्टोबरला खासगी संस्थांना मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी पोर्टलद्वारे दिली जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांसाठी निवडलेल्या उमेदवारांची पडताळणी 11 ते 21 ऑक्टोबरपर्यंत होईल. नंतर 21 ते 24 ऑक्टोबरदरम्यान निवड झालेल्यांचे समुपदेशन करून त्यांची नेमणूक केली जाणार आहे.
शिक्षकभरतीचे संभाव्य वेळापत्रक :-
पोर्टलवर जाहिराती अपलोड – 15 ते 31 ऑगस्ट
उमेदवारांचा प्राधान्यक्रम – 1 ते 15 सप्टेंबर
उमेदवारांची पडताळणी – 11 ते 21 ऑक्टोबर
जिल्हास्तरीय समुपदेशन – 21 ते 24 ऑक्टोबर