शेतीशिवार टीम, 7 मार्च 2022 : अहमदनगर जिल्ह्यातील सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या सहकार्यातून व वाबळेज इव्हेंट यांच्या संयोजनातून 11 ते 15 मार्चदरम्यान संत शेख महंमद महाराज यात्रोत्सवानिमित्त शहरातील पंचायत समितीशेजारील मैदानामध्ये स्मार्ट कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक बापूसाहेब वाबळे यांनी दिली.
बापूसाहेब वाबळे यांनी सांगितलं की, प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, बी बियाणे, सेंद्रिय शेती पद्धती, गांडूळ खतनिर्मिती, पशुखाद्य, हार्वेस्टिंग यंत्रे, ट्रॅक्टर्स आधुनिक अवजारे, रासायनिक खते, कृषी मार्गदर्शन पुस्तके, शेळीपालन, ठिबक सिंचन, सोलर उत्पादने, मच्छी व्यवसाय, मत्स्यपालन या विषयी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
त्याचबरोबर महिला बचतगटांची उत्पादने, ऑटो, गृहोपयोगी वस्तू, तालुका कृषी गृहोपयोगी वस्तू, तालुका कृषी विभाग, अशा अनेक नामांकित कंपन्यांचे स्टॉल असणार आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनामध्ये मुख्य आकर्षण म्हणून दीड टन वजन व एक कोटी किंमत असलेला गजेंद्र रेडा शेतकऱ्यांसाठी पाहण्यासाठी राहणार आहे.
जिल्हा बँक संचालक अनुराधा नागवडे यांच्या वतीने तालुक्यातील बचतगट महिलांसाठी मोफत स्टॉल व्यवस्थाही केलेली आहे. प्रदर्शनात जिल्ह्यातील सर्व व्यावसायिकांनी सहभागी व्हावे व शेतकऱ्यांनी या आधुनिक तंत्रज्ञान प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही वाबळे यांनी केले.