राज्यातील बहुचर्चित सोलापूर- तुळजापूर – धाराशिव रेल्वे मार्गसंदर्भात सोलापूर जिल्ह्यातील 10 गावच्या शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित झालेल्या बाधित असलेल्या 5 हजार 85 शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर पैसे जमा करुन घेण्यासाठी भूसंपादन खात्याकडून नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.
या नोटिसा मिळाल्यापासून 60 दिवसांत आवश्यक ती कागदपत्रे घेवून भूसंपादन कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी दिली.
या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने आपल्या हिश्श्याचे 544 कोटींचा निधीही मंजूर केला आहेत. यामुळे या रेल्वेमार्गाच्या बांधकामाचा पहिला 30 किलोमीटरचा टप्पा जानेवारीपासून सुरू करण्याची तयार रेल्वेच्या संबंधित यंत्रणेकडून सुरू झाली आहे. हा मार्ग तयार झाल्यावर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विकासाची गंगा वाहणार आहे. .
सोलापूर जिल्ह्यातील होनसळ, देगाव, सेवालालनगर आणि बाणेगाव या 4 गावच्या शेतकऱ्यांना यापुर्वीच नोटिसा पाठविल्या होत्या. उर्वरित खेड, मार्डी, बाळे, भोगाव, कसबे सोलापूर, मुरारजी पेठ आदी 6 गावातील बाधितांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.
84 किलोमीटरचा मार्ग, 110 पुल..
हा रेल्वेमार्ग 30 महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. या मार्गावर सांजा, वडगाव आणि तुळजापूर, असे तीन नवीन रेल्वे स्थानक उभारले जाणार आहेत. या कामाचे तीन टप्पे करण्यात आले असून धाराशिव जिल्ह्यातील कामाचे दोन स्वतंत्र टप्पे करण्यात आले आहेत.
एकूण 84 कि.मी. लांबीच्या या रेल्वेमार्गावर 110 पूल आणि तीन मोठे उड्डाणपूल असणार आहेत. आता या प्रकल्पाच्या कामाला वेग आला असून अडीच वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार आहे .
दहा रेल्वे स्टेशनचा समावेश..
या बहुचर्चित मार्गावर सोलापूर, खेड, मार्डी, तामलवाडी, माळंबा, रायखेल, वडगाव, तुळजापूर, सांजा व धाराशिव अशी दहा रेल्वे स्टेशनचा समावेश असणार आहे. पुढील महिन्यात प्रत्यक्षात भूसंपादनाच्या कामाला सुरुवात होणार असल्याचेही भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी सांगितले.