वनरक्षकनंतर आता नाशिक – नागपुरात तलाठी परीक्षेचा पेपरही फुटला ! पोलिसांकडून टॅब, मोबाईल, वॉकीटॉकी, हेडफोन्स जप्त..
राज्यात यंदा चार वर्षांनंतर तलाठी भरती परीक्षा होत असून, यासाठी दहा लाखाहून अधिक उमेदवारांनी अर्ज केला आहे. गुरुवारपासून राज्यातील विविध केंद्रांवर या परीक्षेला सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी नाशिक व नागपूरच्या केंद्रांवर पेपर फुटल्याची चर्चा आहे. नाशिकच्या म्हसरूळ येथील परीक्षा केंद्राबाहेर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
या संशयिताच्या झाड – झडतीत पोलिसाना टॅब, दोन मोबाईल, वॉकीटॉकी, हेडफोन्स सापडले असून, मोबाईलमध्ये पेपरमधील प्रश्नांची छायाचित्रे आढळली आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली.
राज्यभरात एकाच वेळी तलाठी भरती राबवण्यात येत आहे. त्यासाठी टीसीएसमार्फत राज्यात ३६ जिल्ह्यांमध्ये गुरुवारपासून परीक्षा सुरू झाली. नाशिक जिल्ह्यात ८० हजारांच्या आसपास उमेदवारांनी अर्ज केला आहे. त्यानुसार टीसीएसकडून जिल्ह्यामध्ये ११ केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये नाशिक शहरातील आठ केंद्रांचा समावेश आहे.
येवला, सिन्नर व त्र्यंबकेश्वर येथे प्रत्येकी एक केंद्र आहे. पहिल्या टप्प्यात २२ हजार ३०० परीक्षार्थी समाविष्ट आहेत. नाशिक शहरातील म्हसरूळच्या केंद्रावर सकाळी ९ च्या सुमारास पहिल्या टप्प्यातील पहिल्या पेपरला प्रारंभ झाला. त्याचवेळी केंद्राबाहेर एक संशयित वावरत असल्याची तक्रार म्हसरूळ पोलिसांना प्राप्त झाली.
त्यानुसार पोलिसांनी या संशयिताची तपासणी केली असता, त्याच्याकडे विविध साहित्य आढळून आले. त्यामध्ये टॅब, दोन मोबाईल, वॉकीटॉकी, हेडफोन्सचा समावेश आहे. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडील साहित्य जप्त केले आहे.
संशयित ‘त्या’ परीक्षा केंद्रात कोणास मदत करत होता का ? यात अजून कुणाचा सहभाग आहे का ? याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजू पाचोरकर आणि कर्मचाऱ्यांनी कारवाई सुरू केली आहे. रात्री उशिरापर्यंत म्हसरूळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलिसांत पोलिसांना संपूर्ण सहकार्य..
तलाठी भरतीत म्हसरूळ येथील केंद्राबाहेर काहीसा गोंधळ निर्माण झाला. याबाबत पोलिसांकडून संशयिताची चौकशी केली जात असून, त्यानंतर गुन्हा दाखल करण्याबद्दल ते निर्णय घेतील. याप्रकरणी पोलिसांना संपूर्ण मदत करण्यात येणार आहे. परीक्षा घेणाऱ्या टीसीएस संस्थेकडून काही तांत्रिक माहिती हवी असल्यास लेखी पत्र द्यावे, अशा सूचनाही पोलिसांना केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिली.