India’s Longest Tunnel: त्या दुहेरी बोगद्याला अखेर वनविभागाकडून परवानगी! असा होणार ठाणे – बोरिवली प्रवास फक्त 15 मिनिटांत, पहा रोड मॅप..
पूर्व व पश्चिम उपनगरे जोडताना मुंबई महानगर प्रदेशातील दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडून वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने एमएमआरडीएने ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाला नुकतीच राज्य वन्यजीव मंडळाची परवानगी प्राप्त झाली असून, वन्यजीव मंडळाच्या 22 व्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यान भूमिगत भुयारी मार्गाच्या सहाय्याने ठाणे आणि बोरिवलीदरम्यानचे अंतर कमी होणार असून,प्रवासाच्या वेळेत सुमारे दीड तासाची बचत होणार आहे. सद्यःस्थितीत ठाणे ते बोरिवलीदरम्यान घोडबंदर मार्ग 23 किमी अंतराच्या प्रवासासाठी सकाळी आणि संध्याकाळी वर्दळीच्या वेळी एक ते दोन तास आणि इतर वेळी किमान एक तास लागतो.
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरिवली आणि पूर्वेकडील ठाणे जिल्ह्याला जोडणारा सुमारे हा 12 किमीचा प्रकल्प संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणारा अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि आवश्यक पायाभूत सुविधा प्रकल्प आहे.
ज्यामध्ये प्रदेशाची वाहतूक व्यवस्था सुधारून पर्यावरणीय स्थैर्य राखण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्व – पश्चिम लिंक रोड तयार होऊन राष्ट्रीय महामार्ग 3 आणि 8 मधील अवजड व्यावसायिक वाहतुकीसाठी एक महत्त्वपूर्ण कॉरिडॉर म्हणून कार्यरत राहील.
MMRDA मार्फत उभारण्यात येणाऱ्या ठाणे – बोरिवली भूमिगत भुयारी मार्ग प्रकल्पासाठी राज्य वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाल्याने प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा साध्य झाला आहे.
मुंबई आणि ठाणे यासारख्या गजबजलेल्या शहरात भूमिगत बोगद्याचे बांधकाम हा सध्याच्या रहदारीच्या आव्हानांवर उपाय तर आहेच पण शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. हा उपक्रम शहरी नियोजनाच्या दृष्टिकोनातून पर्यावरण संरक्षणासह प्रगतीचा समतोल साधण्यासाठी आणि भविष्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी एक मॉडेल म्हणून अधोरेखित होईल, असे MMRDA चे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले आहे.
असा असणार दुहेरी बोगदा प्रकल्प..
मुंबई जिल्ह्याच्या पश्चिम उपनगरातील बोरिवली आणि ठाणे जिल्ह्याला भूमिगत मार्गाने जोडणाऱ्या प्रकल्पाच्या व्याप्तीमध्ये 10.25 किमीचा बोगदा आणि 1.55 किमीचा पोहचमार्ग असा 13.05 मीटर अंतर्गत व्यासासह सुमारे 12 किमी. लांबीचा दुहेरी भूमिगत बोगदा असणार आहे. प्रत्येक 300 मीटरवर पादचारी क्रॉस पॅसेज आणि प्रत्येक 2 पादचारी क्रॉस पॅसेजनंतर वाहन क्रॉस पॅसेजची तरतूद आहे.
प्रकल्पातील बोगद्यांचे बांधकाम हे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आणि चार टनल बोअरिंग मशीनच्या मदतीने करण्यात येणार आहे. सुमारे 12 किमी लांबीच्या प्रकल्पातील 4.43 किमी लाबी ही ठाणे जिल्ह्यातून, तर 7.4 किमी लांबी ही बोरिवलीमधून प्रस्तावित आहे.
प्रकल्पातील या बोगद्यामध्ये अग्निशमन यंत्रे, पाण्याची नाली, स्मोक डिटेक्टर, एलईडी लाईटचे सकेत फलक लावले जातील. तसेच बोगद्यात नैसर्गिक किंवा यांत्रिक मार्गाने पुरेशी वायुविजन प्रणाली देखील उभारली जाणार आहे.