शेतीशिवार टीम,20 डिसेंबर 2021 :- एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई हायकोर्टात झालेल्या आजच्या सुनावणीनंतर एसटी कर्मचारी संघटनेचे नेते अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपातून एक संघटना बाहेर पडल्याने संपात उभी फूट पडली आहे.
परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर, सरचिटणीस शेषराव ढोणे संयुक्त पत्रकार परिषद घेत संप मागे घेतल्याची घोषणा केली.
पत्रकार परिषदेत अजय गुजर म्हणाले की, 21 ऑक्टोबर 2021 नुसार 4 नोव्हेंबर पासून पुकारलेल्या संपाला आज 45 दिवस झाले आहेत. गेल्या 45 दिवसांत संप शांततेत पार पडला.
दरम्यान, परिवहन मंत्र्यांसोबत आमच्या दोन-तीन वेळेस चर्चा झाल्या. त्यानंतर काल शरद पवार यांच्यासोबत दिल्लीत चर्चा झाली. त्यांनी विलीनिकरणाबाबत जो निर्णय होईल तो मान्य करण्याचं ठरवलं. राज्य शासनामध्ये विलीनिकरणावर आम्ही ठाम आहोत.
विलिनीकरणाचा निर्णय आता कोर्टात प्रलंबित असल्यानं आणि कोर्टानं यासाठी 12 आठवड्यांचा अवधी दिल्यानंतर 20 जानेवारी पर्यंतचा हा काळ आहे. त्यातच आज हायकोर्टात समितीचा प्राथमिक अहवाल सादर झाला.
यावर दिवसभर आमच्या चर्चा झाल्या यामध्ये कोर्टाचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल.संप काळात निलंबन (Suspension) झालेल्या कर्मचाऱ्यांवरील (MSRTC) कारवाया रद्द करुन त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचं लेखी आश्वासन अनिल परब यांनी दिलं आहे. तसेच इतर मागण्याची चर्चेतून सोडवण्यात येतील असंही आम्हाला लेखी आश्वासन देण्यात आलं आहे.