शेतीशिवार टीम,21 डिसेंबर 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अखेरच्या दिवसापर्यंत 148 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 31 अर्ज बाद झाल्याने कुकडी कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात 117 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध झाले असून, जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने पाचपुते गटाला मोठा धक्का बसला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी कारखान्याच्या 21 जागांच्या निवडणुकीसाठी माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते आणि माजी आमदार कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष राहुल जगताप गटाकडून अखेरच्या दिवसापर्यंत एकूण 148 उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
आज सोमवार दि .20 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणूक छाननी प्रक्रियेत 148 उमेदवारांपैकी 31 उमेदवारांचे उमेदवारी विविध कारणाने अर्ज बाद झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिमान थोरात यांनी सांगत कुकडी कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात 117 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध झाले असल्याची माहिती दिली.
माजी मंत्री आ.पाचपुते गटाकडून जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे यांनी इतर मागासवर्गीय मतदार संघातून 2 अर्ज तर सर्वसाधारण ऊस उत्पादक व्यक्तीमध्ये 1 उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
यातील इतर मागासवर्गीय मतदार संघातील दोन्ही अर्ज कार्यक्षेत्रात रहिवासी नसल्याचे कारणाने बाद झाले तर सर्वसाधारण ऊस उत्पादक व्यक्ती मधील अर्ज ऊस न घातल्याच्या कारणामुळे अर्ज बाद झाल्याने पाचपुते गटाला मोठा धक्का बसला आहे.