अबब ! ‘हा’ उच्च शिक्षित तरुण ‘या’ पिकाची शेती करून मिळवतो लाखोंचे उत्पन्न

0

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील शेळकेवाडी (राजापूर ) येथील सुशिलकुमार शेळके या उच्च शिक्षित इंजिनिअर तरूणाने व वडील शिवाजी मानकुजी शेळके यांनी शेतात पारंपारीक पिकांऐवजी जिरेनियम शेतीचा पर्याय स्वीकारून जिरेनियम शेतीचा पहिलाच प्रयोग यशस्वी करुन दाखवला आहे.

या दोघा पितापुत्रांनी सोशल मिडीयावर तसेच प्रत्यक्ष भेट देऊन जिरेनियम शेतीची माहिती घेतली . आपणही अशा प्रकारची शेती करावी हा ध्यास शेळके यांनी घेतला.

सुरवातीला त्यांनी एक एकर मध्ये जिरेनियमची लागवड केली ,त्यासाठी त्यांना सुमारे एक लाख रुपये खर्च आला. सध्या त्यांना शेतीतून जिरेनियम वनस्पतींच्या पानांपासून ३० ते ३५ किलो तेल मिळाले. जिरेनियमच्या तेलाला एका किलोला १२५०० रुपये भाव मिळतो. यामुळे शेळके यांनी जिरेनियम शेतीत पुढचं पाऊल टाकत स्वत:चा डिस्टिलेशन प्लँट उभा करत आहेत. त्यासाठी त्यांना अडीच लाख रुपये खर्च आला आहे.

जिरेनियम शेतीतून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळाल्याने आता त्यांनी 10 एकर लागवडीची तयारी सुरू केली आहे. तसेच ते आपल्या शेजारील शेजाऱ्यांना ही मार्गदर्शन करत आहेत. चांगला नफा मिळत असल्याने शेजारील शेतकर्यांनी सुद्धा जिरेनियम लागवडीची तयारी दाखवली आहे.

जिरेनियम वनस्पतीचे तेल सुगंधी परफ्युम, अरोमा थेरपी , सौंदर्य प्रसाधनांमध्ये प्रामुख्याने वापरले जाते. जिरेनियमला असलेला मूळचा सुगंध तेलातही उतरतो . त्यामुळे त्याला सौंदर्यप्रसाधने निर्मितीत मोठी मागणी असते . जवळपास १२ ते १३ हजार रुपये लिटर या दराने हे तेल विकले जाते.

जिरेनियम पिकाला वन्यप्राणी, पशुपक्षी यांच्यापासून काहीही धोका नाही. एखाद वेळेस बुरशीसारखा रोग पडला तर एखादी फवारणी केल्याने ते रोगमुक्त राहू शकते. जिरेनियमचे एक झाड घरासमोर लावले तर डासापासूनही आपल्याला मुक्ती मिळू शकते असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.या तेलाचा वापर सौंदर्यप्रसाधने व औषधी निर्मितीसाठी होत असल्याने याला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. एकूण मागणीच्या फक्त दहा टक्के उत्पादन भारतात होत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

कांदा, मूग , ऊस यासारखे इतर पीक घेतल्यानं उपन्नाची हमी नसते. यामुळे मी या शेतीकडे वळलो. जिरेनियम एक औषधी वनस्पती आहे. या पिकाला कोणतेही रोग होत नाही त्यामुळे फवारणीचा ही खर्च कमी होतो. एकदा लागवड केल्यानंतर तीन वर्षे उत्पन्न मिळते. एका कापणी ला १० किलो तेल मिळते. वर्षभरात ४० किलो तेल मिळते .त्याचा खर्च वजा जाऊन वर्षभरात ४लाखांचे उत्पन्न सहज मिळते. – शिवाजी शेळके- (९७६७५६४२७७ )

जिरेनियमच्या तेलाचा वापर सुगंधी साबण, अगरबत्ती, अत्तर तयार करण्यासाठी केला जातो. शेतकऱ्यांनी गटानं एकत्रित येऊन उत्पादन घेतलं तर शेतकऱ्यांना फायदा होतो. शेतकऱ्यांनी कंपन्यांशी लेखी करार केला पाहिजे. हा प्रकल्प जर यशस्वी झाला तर तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर राबवता येईल. सुगंधी वस्तूंची मागणी पाहता जिरेनियम शेतीतून शेतकऱ्यांना उत्पन्नाचा चांगला मार्ग उपलब्ध होऊ शकतो.
अशोक नेरलेकर- कृषी सहायक

Leave A Reply

Your email address will not be published.