विजयादशमीच्या शुभ मुहुर्तावर कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. शेवगाव तालुक्याच्या पूर्वभागातील अनेक गावांत शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड केली; परंतू सध्या स्थितीत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांनी पिकविलेल्या पांढऱ्या सोन्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. कापसाला किमान 10 ते 15 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
यावर्षी तालुक्यातील बोधेगाव, लाडजळगाव, मुंगी, हातगाव, नागलवाडी गोळेगावसह परिसरातील शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात कपाची लागवड केली होती; परंतू पिकावर लाल्या, बोंडे सडणे, पीक उन्मळून पडणे, पिकांची वाढ खुंटणे, फकडी पडणे, आदी रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने तसेच कमी अधिक झालेल्या पावसामुळे उत्पन्नात कमालीची घट होण्याची शक्यता असून, काही ठिकाणी कपाशी पिकावर केलेला खर्चही निघू शकत नाही, अशी परिस्थिती आहे.
त्यातच व्यापाऱ्यांकडून कापसाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनी मोठे कष्ट करून कपाशीचे पीक जगविले. मात्र, कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने मिळेल त्या भावात शेतकरी कापसाची विक्री करत आहेत.
दरवर्षी व्यापाऱ्यांकडून दसऱ्याला कापूस खरेदीस प्रारंभ केला जातो. दसऱ्याच्या मुहुर्तावर काही शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आणला होता. शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे कवडीमोल भावात कापसू विकावा लागत आहे. कापसाला दर्जा नसल्याचे सांगत वाटेल त्या दरात कापूस खरेदी करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू आहे.
कापसाला साधारण 10 हजार ते 15 हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळणे अपेक्षित आहे. मात्र, खासगी व्यापाऱ्यांकडून चांगल्या दर्जाचा कापूसही 7000 ते 8000 रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केला जात आहे.
कापूस वेचणीला प्रति किलोला 10 ते 15 रुपये मोजावे लागत असताना पन्नास टक्केही रक्कम पदरात पडत नाही, त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव देण्याची मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे.