शेतीशिवार टीम, 24 डिसेंबर 2021 : राज्यात आज ओमिक्रॉन (Omicron) रुग्णांची संख्या 100 च्या पुढे गेली आहे. यानंतर ठाकरे सरकारने निर्बंध जाहीर केले आहेत. त्याअंतर्गत रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत संचारबंदी लागू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

नाईट कर्फ्यूमध्ये 5 पेक्षा जास्त लोक कुठेही जमू शकत नाहीत. अत्यावश्यक सेवांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने लग्न समारंभ आणि धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची मर्यादाही निश्चित केली आहे.

महाराष्ट्राचे मंत्री अनिल परब म्हणाले की, बंद ठिकाणी 100 पेक्षा जास्त लोक कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नाहीत, तर खुल्या ठिकाणी जास्तीत जास्त 250 लोक सहभागी होऊ शकतात. हॉटेल्स, स्पा, थिएटर्स क्षमतेच्या 50% ग्राहकांसह चालू शकतात.

चिंताजनक : Omicron चे आजही 20 नवे रुग्ण :-

आज राज्यात ओमिक्रॉनचे (Omicron) 20 नवे रुग्ण आढळले. यानंतर एकूण बाधितांची संख्या 108 झाली आहे. त्यापैकी 54 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज आढळलेल्या 20 प्रकरणांपैकी 11 मुंबईत, तर 6 पुण्यात, 2 सातारा आणि 2 अहमदनगरमध्ये आढळून आले आहे.

या नवीन रुग्णांपैकी 15 जणांनी परदेश दौरा केल्याचे आढळून आले आहे. एकाने देशातच प्रवास केला होता, तर इतर लोक त्याच्या संपर्कात आले होते. यापैकी एक रुग्ण अल्पवयीन आहे, तर 6 रुग्ण 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. सध्या यांना कोणतेही लक्षणं नसून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

नवे नियम आज रात्रीपासून लागू….

संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी असेल.

लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25% यापैकी जे कमी असेल ते.

इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25% यापैकी जे कमी असेल ते.

· उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशाठिकाणी क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी २५ टक्के उपस्थिती असेल. अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या 25% पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.

क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.

वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना 27 नोव्हेंबर 2021 चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.

उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या 50% उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच 50% क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.

याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी त्यानी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *