शेतीशिवार टीम, 24 डिसेंबर 2021 :- कानपूरमध्ये परफ्यूम व्यापाऱ्याच्या घरावर सुरू असलेल्या छापेमारीमध्ये आत्तापर्यंतची सर्वात मोठी वसुली करण्यात आली आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर (Central indirect tax) आणि सीमा शुल्क मंडळ (CBIC) चे अध्यक्ष विवेक जोहरी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

ते म्हणाले की, बिले व कर न भरता त्रिमूर्ती फ्रॅग्रन्समध्ये व्यवसाय केला जात असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. या आधारे तीन संस्थांवर छापे टाकून तब्बल150 कोटींची रोकड जप्त करण्यात आली. ते म्हणाले की, सीबीआयसीच्या (CBIC) इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी रेड आहे.

एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना जोहरी यांनी सांगितलं की, परफ्यूम व्यापारी पियुष जैन यांच्या घरात नोटांची मोजणी अजूनही सुरू आहे. डीजीजीआय (DGGI) आणि आयकर विभागाने (Income Tax Department) काल सकाळी कानपूर आणि कन्नौजमधील परफ्यूम व्यापारी पियुष जैन यांच्या आवारात छापे टाकले. लॉकर्समध्ये एवढी रोकड भरलेली होती, त्याची मोजणी अजूनही सुरू आहे.

या संदर्भात सीबीआयसीचे अध्यक्ष विवेक जोहरी यांनी सांगितलं की, आतापर्यंत 150 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. नोटांची मोजणी सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नोटा मोजण्यासाठी 13 मशीन मागवण्यात आल्या आहेत. तर 80 नवीन पेट्या आणि पैसा भरून नेण्यासाठी एक कंटेनर देखील मागवण्यात आला आहे.

आतापर्यंत कोणालाही अटक नाही…

आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे विवेक जोहरी यांनी स्पष्ट केले. सीबीआयसीच्या अध्यक्षांनी कबूल केले की बोगस बिलिंग आणि फसव्या कर्जाचे प्रकरण आढळले आहे. ते म्हणाले की आमच्याकडे माहिती होती की, पान मसाला आणि त्रिमूर्ती फ्रॅग्रन्स बिल न करता आणि कर न भरता माल पाठवत होते. नोटांची मोजणी सुरू असल्याने वसुलीत आतापर्यंत मिळालेल्या 150 कोटींच्या रकमेतही वाढ होऊ शकते, असे ते म्हणाले.

कोण आहे हे पियुष जैन :- 

पियुष जैन हा परफ्यूमचा व्यापारी असून मूळचा कन्नौजच्या छिपट्टीचा असून तो सध्या जुही पोलीस स्टेशन हद्दीतील आनंदपुरी येथे राहतो. त्यांच्या परफ्यूम फॅक्टरी व्यतिरिक्त कन्नौजमध्ये एक कोल्ड स्टोरेज आणि एक पेट्रोल पंप देखील आहे.

परफ्युम कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबईत असून तेथे घरही आहे. पियुष जैन यांच्या कारखान्यातील परफ्यूम यूपीहून मुंबईला जातो. मग तो देश-विदेशातील बाजारपेठेत पोहोचतो. जैन यांच्या सौदी अरेबियातील दोन, देशाच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये दोन अशा सुमारे 40 कंपन्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *