शेतीशिवार टीम, 24 डिसेंबर 2021 : देशातील कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचा (Omicron) वेग वाढला असताना महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये ओमिक्रॉनचे नवीन रुग्ण आढळल्यानंतर एकूण संक्रमित लोकांची संख्या 400 पर्यंत पोहचली आहे.
परंतु काळ राज्यात ओमिक्रॉनचा विस्फोट झाला असून गुरुवारी 23 नवे रुग्ण आढळल्यानंतर, आता आज अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे ओमिक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.
आता आजच जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. या शाळेतील 16 विद्यार्थ्यांसह 3 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वीही पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील 7 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.
या शाळेबद्दल सविस्तर माहितील अशी की, या टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयात राज्यभरातून 400 हुन अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यातील काहींना सर्दी खोकल्याचा त्रास सुरू झाल्याने त्यांची चाचणी करण्यात आली. यातील 16 विद्यार्थ्यांसह 3 शिक्षक पॉझिटिव्ह आढळले. हे सर्व विद्यार्थी 6 वी ते 12 वी या वर्गातील असून शाळेच्या वसतिगृहात राहतात.
काही विद्यार्थ्यांना सर्दी खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांची तपासणी करण्याचा निर्णय झाला. एक एक करता त्यांची संख्या वाढत गेली. त्यामुळे तालुका आरोग्य प्रशासनाने तेथे धाव घेतली.
बाधित आढळून आलेल्या विद्यार्थ्यांना पारनेरच्या सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे राहणारे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांचीही चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यांना बाधा झाली आहे, त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांच्या पालकांना यासंबंधीची माहिती कळविण्यात येत आहे.