Take a fresh look at your lifestyle.

वनविभागासह तलाठी भरतीही होणार रद्द ? आरोपी गणेश गुसिंगेच्या मोबाइलमध्ये आढळल्या वनविभागाच्या प्रश्नपत्रिका..

0

तलाठी परीक्षेत हायटेक कॉपीच्या प्रकारानंतर अनेक घडामोडी आता समोर येत असून नुकतीच पार पडलेली वनविभागाची परीक्षादेखील वादात सापडण्याची चिन्हे आहेत. याबाबत खुद्द नाशिक पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली असून तलाठी परीक्षेतील मुख्य संशयित असलेल्या गणेश गुसिंगे याच्या मोबाइलमध्ये वनविभागाच्या प्रश्नपत्रिकाही आढळून आल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे.

नाशिकच्या तलाठी भरती परीक्षेत काही दिवसांपूर्वी हायटेक कॉपीचा प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली यानंतर संशयित गणेश गुसिंगे यास ताब्यात घेतल्यानंतर अनेक प्रकार समोर आले.

पिंपरी – चिंचवड पोलीस भरती आणि म्हाडाच्या पेपरफुटीप्रकरणी गुसिंगे पोलीस दप्तरी फरार आहे. याबरोबरच इतर परीक्षांमध्येही त्याने घोळ केल्याचे समोर आले आहे. अशातच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून घेण्यात आलेल्या भरती परीक्षेत गणेश गुसिंगेला 138 गुण मिळून तो उत्तीर्ण झाल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले.

संशयित गुसिंगेने तलाठी भरतीसह इतर परीक्षांतदेखील गैरव्यवहार केल्याचे पोलीस तपासात उघड झाल्याने तसेच तो परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे जाहीर झाल्याने या सर्व प्रकरणांत त्याची कसून चौकशी करण्यात येणार असल्याचे रविवारी पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे आता वनविभाग – तलाठी भरतीच्या या गैरप्रकाराबाबत विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात असून आता ही परीक्षा रद्द होणार का ? हा प्रश्न विचारला जात आहे.

कोण आहे गणेश गुसिंगे ?

तलाठी भरती परीक्षेत गैरप्रकारप्रकरणी नाशकात अटक करण्यात आलेला संशयित गणेश गुसिंगे हा म्हाडा आणि पिंपरी – चिंचवड पोलीस भरती घोटाळ्यात फरार असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरोधात म्हाडा परीक्षा भरतीमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी खेरवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे.

तर पिंपरी – चिंचवड पोलीस भरती 2019 मध्ये गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर गुसिंगेवर 2021 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार आणि हायटेक कॉपी करण्यामध्ये एक टोळीच कार्यरत असल्याचा संशय समितीला असून यामध्ये गणेश गुसिंगे आणि त्याचे साथीदार असल्याचा आरोप संघटनेकडून केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.