11 वर्षांनंतर स्वप्न होणार साकार ! 126Km अंतरासाठी 20,000 कोटींचा खर्च, 5 तासांचा प्रवास फक्त तासाभरात होणार पूर्ण..
दशकाहून अधिक काळ फायलींमध्ये दबलेल्या विरार – अलिबाग कॉरिडॉरचा मार्ग मोकळा होणार आहे. ही योजना लवकरच साकार होणार आहे. MMR च्या या महत्त्वाच्या प्रोजेक्टची लांबी 126 किमी आहे. या कॉरिडॉरच्या उभारणीसाठी सुमारे 18 कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. या प्रोजेक्टसाठी सुमारे 20 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून दोन टप्प्यात तो पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे..
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, स्वारस्य दाखवणाऱ्या कंपन्यांना निविदा भरण्यास सांगण्यात आले आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच निविदा वाटप करण्यात येईल. कॉरिडॉरचे काम सुरू करण्यासाठी एमएसआरडीसीने काही दिवसांपूर्वी निविदा प्रक्रिया सुरू केली होती. या प्रकल्पासाठी कंपन्यांकडून एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (EOI) मागविण्यात आले होते..
MSRDC कडे सोपवली जबाबदारी..
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 11 वर्षांपूर्वी 126 कि.मी. या लांब कॉरिडॉरचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यापूर्वी कॉरिडॉरच्या बांधकामाची जबाबदारी MMRDA कडे होती, मात्र भूसंपादन प्रक्रियेला होत असलेला विलंब पाहता सरकारने ही जबाबदारी MSRDC कडे सोपवली.
MMR च्या या महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी एमएसआरडीसीने भूसंपादनाचे काम जवळपास पूर्ण केले आहे. प्रोजेक्टच्या पहिल्या टप्प्यासाठी 93 टक्क्यांहून अधिक जमीन प्राप्त झाली आहे. लवकरच उर्वरित जमिनीचेही अधिग्रहण करण्यात येणार आहे..
दोन टप्प्यात काम केले जाणार आहे.
कॉरिडॉरचे बांधकाम दोन टप्प्यात केले जाणार आहे. एका टप्प्यात 98 किमी. आणि दुसऱ्या टप्प्यात 29 कि.मी. बांधकामे होतील. हा कॉरिडॉर मुंबई – अहमदाबाद, मुंबई – नाशिक, मुंबई – पुणे एक्सप्रेस – वे महामार्ग, मुंबई – गोवा एक्सप्रेस – वे, पनवेल-जेएनपीटी आणि अटल सेतू यांनाही जोडला जाणार आहे.
कॉरिडॉरच्या बांधकामामुळे विरार ते अलिबाग हा प्रवास अवघ्या दीड ते दोन तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. सध्या विरारहून अलिबागला जाण्यासाठी 4 ते 5 तास लागतात.
विरार अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉरचे फायदे..
विरार अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉरच्या अंमलबजावणीमुळे अनेक महत्त्वाचे फायदे होतील :-
– VAAMC कॉरिडॉर कल्याण, वसई, भिवंडी, अंबरनाथ, पनवेल, तळोजा आणि उरण अशा विविध भागातून जाईल. या सर्व क्षेत्रांमध्ये प्रचंड आर्थिक वाढ दिसून येईल आणि ते नियोजित उप नगरांमध्ये रूपांतरित होऊ शकतील.
– हा आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) आणि मालवाहतूक कॉरिडॉर यासारख्या प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांना जोडणारा दुवा असेल.
– हा महामार्ग कॉरिडॉर नवी मुंबई विमानतळ इम्पॅक्ट नोटिफाइड एरिया (NAINA) मधील मेगा टाउनशिपच्या विकासास मदत करेल.
– या कॉरिडॉरमुळे महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल.
– हा NH8 (दिल्ली – मुंबई), NH3 (आग्रा-दिल्ली) आणि NH4 (पुणे-बंगलोर) सारख्या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गावरून शहरापर्यंत जलद प्रवेश सुनिश्चित करेल. हा कॉरिडॉर महाराष्ट्र आणि भारताच्या आर्थिक केंद्रांमधील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करेल.
– यामुळे पनवेल, उरण, कल्याण – शीळ रोड, विरार आणि मुंबईच्या बाहेरील भागातील मायक्रो मार्केटमध्ये परवडणाऱ्या घरांच्या मागणीला चालना मिळेल.