दूध उत्पादकांना दिलासा देण्याकरिता राज्य सरकारने प्रतिलिटर 5 रुपये अनुदान जाहीर केले आहे . राज्यातील सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांमार्फत संकलित दुधासाठी हे अनुदान दिले जाणार आहे. मात्र ही योजना केवळ महिनाभरासाठीच लागू केली असून, नाशिक विभागातील 15 सहकारी संघ, मल्टिस्टेट आणि 61 खासगी अशा 77 दूध प्रकल्पांत दूध जमा करणाऱ्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ होणार आहे.

राज्य सरकारने अधिवेशनात केवळ सहकारी दूध संघांनाच अनुदान देण्याबाबत निर्णय घेतला होता. मात्र, राज्यातील 72 टक्केच दूध खासगी संघांमार्फत संकलित केले जाते. त्यामुळे बहुतांश शेतकरी या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने सरसकट सर्वांना अनुदान देण्याची मागणी पुढे आली.

ही मागणी मान्य करत मंत्रीमंडळाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यानुसार, आता सहकारी , खासगी दूध संघांना दूध पुरविणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा कालावधी 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारीपर्यंत असून जास्तीत जास्त उत्पादकांना या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिकच्या पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ. बी. आर नरवाडे यांनी केले आहे.

पशुसंवर्धन विभाग व दुग्धव्यवसाय विकास विभाग संयुक्तरीत्या या योजनेची अंमलबजावणी करीत आहेत त्यानुसार राज्यातील सहकारी दूध संघ, खासगी दूध प्रकल्प, शीतकरण केंद्रे व फॉर्मर प्रोड्युसर कंपनी यांना योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज सादर करण्यासाठी कळविण्यात आले असून प्राप्त अर्जांची छाननी करून प्रकल्पांना माहिती भरण्यासाठी लॉगिन आयडी व युजर आयडी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

पशुसंवर्धन विभाग व दुग्धव्यवसाय विकास विभागामार्फत प्रकल्पांसमवेत संयुक्तरीत्या बैठक घेऊन योजनांची माहिती देण्यात आली आहे. तसेच, शेतकऱ्यांच्या जनावरांना इअरटॅग करण्याची कार्यवाही सुद्धा मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे.

तसेच, या योजनेपासून एकही दूध उत्पादक शेतकरी वंचित राहू नये, यासाठी शेतकऱ्यांनी जनावरांचे इअरटॅग करून घेण्यासाठी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा. तसेच, दूध पुरवठा करत असणाऱ्या प्राथमिक सहकारी दूध संस्था, दूध संकलन केंद्र, शीतकरण केंद्र यांच्याकडे आपला दैनदिन, तसेच 10 दिवसांचा तपशील देऊन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *