बहुप्रतिक्षित वर्धा – नांदेड या 284 किमी लांबीच्या रेल्वे मार्गाचे काम 40 किलोमीटरपर्यंत पूर्ण झाले आहे. वर्धा – नांदेड कामासही सध्या गती मिळाली असून वर्धा ते यवतमाळ रेल्वे धावावी, यासाठी आता आग्रह धरला जात आहे. त्यातूनच डिसेंबर अखेरपर्यंत वर्धा ते यवतमाळ दरम्यान रेल्वे गाड्या धावण्यासाठी रेल्वे लाईन, ब्रिज, अंडरपास, ट्रेनर व स्टेशन निर्मितीचे काम जलद गतीने करावे असे निर्देश आढावा बैठकीत देण्यात आले..
वर्धा – नांदेड, कामाबाबतचा घेण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला खा. भावना गवळी यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, रेल्वे आढावाचे सहा. कार्यकारी अभियंता विनोद वललवार, सहाय्यक अभियंता विनीत धोंबे, पठाण व उपप्रबंधक आर. व्ही. एन. एल. टेमुरकर आदी उपस्थित होते.
रेल्वे प्रकल्पाच्या प्रगतीबाबत रेल्वे अधिकान्याकडून यावेळी आढावा घेण्यात आला. यामध्ये वर्धा ते नांदेड या 284 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गापैकी आतापर्यंत जवळपास ४० किलोमीटर रेल्वे मार्गाांचे काम पूर्ण झाले आहे. 32 मोठे ब्रिज, 50 मध्यम ब्रिज व 19 अंडरपासचे काम पूर्ण झाले आहे. तसेच तीन रेल्वे स्थानकाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. या
वेळी वर्धा ते नांदेड रेल्वे मार्गाचे काम युद्ध पातळीवर करावे, रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या शेत जमिनीचा भूसंपादन मोबदला त्वरित देण्यासाठी रेल्वे विभागाने कार्यवाही करावी. तसेच राहिलेल्या 29 गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन करण्याची कार्यवाही दीड महिन्यात करण्याच्या सूचना दरम्यान दिल्या.
तसेच वर्धा – देवळी कळंब – यवतमाळ डिसेंबर अखेरपर्यंत रेल्वे सुरू झाली पाहिजे, यासाठी पॅकेज एक व दोन अंतर्गत असणारी सर्व कामे दोन महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले.
रेल्वे मार्गाांसाठी हे जमिनी अधिग्रहण करताना काही ठिकाणी दहा गुंठे, वीस गुंठे जमिनी शिल्लक राहिल्या आहेत. या शेतजमिनी शेतकऱ्यांना पिकविता येत नसल्याने काही फायद्याच्या नाहीत. त्यामुळे या शेतजमिनी अधिग्रहण कराव्या अशी सूचना देखील केली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी रेल्वेचे अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना या संदर्भात प्रस्ताव तयार करून सादर करण्याच्या सूचना केल्या.
पांदण व शिवार रस्त्यांना प्राधान्य द्या !
यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे. येथील नागरिकांच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत शेती हे असल्यामुळे कुठलेही विकासकाम करताना शेती संबंधित बाबींना प्राधान्य देणे आवश्यक आहे, त्यामुळे वर्धा ते नांदेड रेल्वे मार्गाची निर्मिती करीत असताना रेल्वे मार्गाच्या मधात येणारे पांदन रस्ते व शिवार रस्ते यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.
त्यासाठी रेल्वे विभागाने विशेष लक्ष देऊन शेतकऱ्यांना शेतात ये – जा करण्यासाठी अंडरपास व छोटे ब्रिज यासारखे पर्याय उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.