राज्य शासनाचा मोठा निर्णय | राज्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना मोठा दिलासा !

0

शेती शिवार टीम, 12 मे 2022 :- राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका माहे जानेवारी 2021 मध्ये पार पाडण्यात आल्या आहेत. यात राखीव प्रवर्गातील ग्रामपंचायत सरंपच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना विशेष बाब म्हणून जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात पुनश्च एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

सबब जात वैधता प्रमाणपत्र 17 जानेवारी 2023 पर्यंत सादर करण्याबाबतची घोषणा ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा यथास्थिती, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता राखीव जागेसाठी निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक व्यक्तीने नामनिर्देशन पत्राबरोबर सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची तरतूद आहे.

मात्र वेळेत जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्यामुळे उमेदवारांना राखीव पदांसाठी निवडणूक लढविण्याच्या संधीपासून वंचित राहू नये यासाठी सदस्य आणि सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याचा शेवटचा दिनांक 28 फेब्रुवारी 2021 असा करून निवडून आल्याच्या दिनांकापासून बारा महिन्यांची मुदत देण्यात आली होती.

त्या अनुषंगाने जानेवारी 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या उमेदवारांनी पडताळणी समितीकडून दिलेले जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक 17 जानेवारी 2022 असा होता. तथापि माहे जानेवारी 2021 च्या ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये मोठ्या प्रमाणावर राखीव प्रवर्गातून उमेदवार निवडून आले आहेत.

त्यात राज्यातील कोव्हीड-19 च्या निर्बंधामुळे विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध होवू शकले नाही. त्यामुळे राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या सरपंच आणि सदस्यांना पदापासून वंचित राहू नये यासाठी विशेष बाब म्हणून ही मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती श्री.मुश्रीफ यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.