पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील अनेक नागरिकांनी घर, कंपनी आणि दुकानांवर सोलर पॅनेल उभे केले असून ते विजेच्या निर्मितीत स्वावलंबी बनले आहेत . पिंपरी – चिंचवडमधील 2000 नागरिकांनी वीज बिल न भरता याउलट कमाईच होत असल्याची दिलासादायक माहिती दिली आहे.
तर पुणे परिसरात उच्च व लघुदाब वर्गवारीतील एकूण 8,812 वीजग्राहकांनी छतावरील सौरऊर्जा प्रकल्प सुरू केले आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात दिवसेंदिवस सौर ऊर्जेचा वापर वाढल्याने अनेक वीज ग्राहकांनी वाढत्या वीज बिलाच्या जोखडातून मुक्ती मिळवत आता स्वतः फ्री वीज वापरत कंपन्यांना वीजही विकत आहे.
आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विजेचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे, शिवाय विजेवरील खर्च देखील वाढत आहे. अशावेळी सोलर पैनल लावून मोफत वीज मिळवणे आणि त्यातून कमाई करणे असे दोन्ही फायदे तुम्ही मिळवू शकता. तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलर पैनल लावून ही गोष्ट साध्य करू शकता.
शिवाय हे सोलर पॅनल लावण्यासाठी सरकार सोलर रूफटॉप योजनेअंतर्गत साहाय्य देखील करते. सौर ऊर्जेचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अपारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार देशभरात सौर ऊर्जेला चालना देते आहे. यासाठीच केंद्र सरकारकडून सोलर रूफटॉप बसवण्यासाठी सबसिडीदेखील दिली जाते. अनेक ग्रामीण भागातील नागरिकांना या योजनेबाबत कल्पना सल्याच दिसून येत असून शहरी नागरिकांनी तरी या योजनेचा पुरेपूर फायदा घेतला आहे.
काय आहे, सोलर रुफटॉप योजना :-
घरे, कार्यालये, कारखाने इत्यादींच्या छतावर सौर पॅनेल बसवण्याची सुविधा सरकार देत आहे. सोलर रूफटॉप योजना (Solar Rooftop Yojana) असे या योजनेचं नाव आहे. या योजनेंतर्गत कोणत्याही नागरिकाला त्याच्या छतावर सौर पॅनेल मोफत बसवता येतील.
1 किलोवॅट सौर पॅनेल बसवण्यासाठी 10 चौरस मीटर जागा आवश्यक आहे. या सोलर रुफटॉप योजनेअंतर्गत सोलर पॅनेलचा लाभ घेता येतो. याचा संपूर्ण खर्च 5-6 वर्षांमध्ये वसूल होतो त्यानंतर 19-20 वर्षांसाठी तुम्ही मोफत वीज वापरू शकता आणि महावितरणला विकू देखील शकता.
या दरात विकत घेतात वीज
वीजग्राहक सोलर पॅनेलमधून वीजनिर्मिती करून, स्वतःला हवी तेवढी वीज वापरतो. मात्र शिल्लक वीज महावितरण कंपनीला विकत येते. यासाठी एप्रिल ते एप्रिल अशी एका वर्षाच्या कालावधीची प्रक्रिया गृहित धरली जाते. महावितरण शक्यतो 3.10 किंवा 3.20 रुपये प्रति युनिटने दराने वीज खरेदी करते अशी माहिती महावितरणने दिली.
घरासाठी एक किलोवॉटचा सोलर प्लांट पुरेसा
एका छोट्या घरासाठी 1 किलोवॅटचा प्रकल्प पुरेसा असतो. तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या जागेवरही या गोष्टी अवलंबून असतात. मात्र, अनुदानासाठी किमान एक किलोवॅटचा प्रकल्प उभारणे बंधनकारक आहे. घरगुती ग्राहकांसाठी 1 ते 3 किलोवॅटपर्यंत 40 टक्के आणि 3 किलोवॅटपेक्षा अधिक ते 10 किलोवॅटपर्यंत 20 टक्के अनुदान देण्यात येते.
तसेच सामूहिक वापरासाठी 500 किलोवॅटपर्यंत आणि प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅटम नुसार गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना 20 टक्के अनुदान मिळते. पुण्यात सध्या लघु व उच्चदाबाच्या एकूण 3 हजार 214 छतांवरील सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.