भारताची खाद्यसंस्कृती संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. त्यातच भारतात सर्वात जास्त दैंनदिन आहारात ज्या अन्नपदार्थाचा समावेश केला जातो तो म्हणजे बटाटा. आपल्या इकडे तर जसा बटाटा कोणत्याही अन्नपदार्थात मिसळून जातो तसं स्वतःला सर्वसमावेशक काही लोक देखील स्वतःला बटाटा म्हणवून घेतात. भारतात अनेक वेगवेगळ्या डिशेस मध्ये बटाट्याचा भरपूर वापर केला जातो त्यामुळे भारतात बटाट्याची मागणी देखील खूप आहे.

याच मागणीला पूर्ण करण्यासाठी भारतातील शेतकरी दिवसरात्र आपल्या शेतात राबत असतो. मात्र, याच कष्टाला आधुनिकतेची जोड देत शेतकरी अशक्य गोष्टी देखील शक्य करू शकतो हे सिद्ध करून दाखवले आहे, पिंपळगाव खडकी येथील एका तरुण शेतकऱ्याने.

विशाल वाबळे यांनी आधुनिक पद्धतीने बटाट्याची शेती करीत एकरी 18 ते 19 टन इतके विक्रमी उत्पादन घेऊन तंत्रशुद्ध शेतीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे.

खडकी येथील हा आधुनिक शेतीचा यशस्वी प्रयोग पाहून परिसरातील अनेक शेतकऱ्यांमध्ये बटाटा लागवड करण्याची इच्छा निर्माण झाली आहे. यावेळी वाबळे यांचे एकरी 22 ते 23 टन उत्पादन मिळवण्याचे उद्दिष्ट होते, मात्र हे उद्दिष्ट ते पुढील हंगामात पूर्ण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

खडकी येथील प्रगतशील शेतकरी घनश्याम निकम यांच्या शेतकरी कुटुंबाचा वारसा घेऊन विशाल यांनी आधुनिक पद्धतीने शेती करत एकरी 19 टन बटाट्याचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. मागील वर्षीही याच पद्धतीने शेती करून त्यांनी भरघोस पीक घेतले होते. वाबळे यांची मंचर पासून 5 किलोमीटर अंतरावर पिंपळगाव खडकी येथे वडिलोपार्जित शेती आहे.

त्यांच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर ऊस शेती केली जाते. याउलट ते आपल्या शेतीत नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची पिके घेत असतात. गवार, कोबी, बीट, कांदा, ऊस अशी विविध पिके घेतात. या सर्व पिकांतून ते भरघोस उत्पादन देखील घेतात.

त्यांनी तीन महिन्यांपूर्वी बटाट्याची लागवड करण्यासाठी पंजाबमधून आणलेल्या पुष्कराज जातीच्या वाणाची निवड केली. जवळ जवळ 2 एकरावर त्यांनी या वाणाची लागवड केली. याकामी त्यांचे मोठे बंधू मयुर वाबळे यांचेही त्यांना मोलाचे सहकार्य लाभले.

बटाटा पिकात घ्यावयाची काळजी :-

लागवडीनंतर बटाटा पीक किमान चार महिन्यांत काढणीस येते. पिकाच्या काढणीआधी किमान 20 दिवस आधी पाणी देणे बंद केले पाहिजे. जेणेकरून, याचा फायदा बटाट्याची साल परिपक्व होण्यास होईल आणि यामुळे बटाट्यातला ओलसरपणाही कमी होतो.

बटाट्याच्या काढणीच्या चार ते पाच दिवस आधी पिकाच्या पाल्याची कापणी करून जमीन निर्मळ केली पाहिजे. दिवसा काढणी करावी. मात्र, काढणीवर उन्हाचा परिणाम होऊ नये, याची विशेष काळजी घेतली पाहिजे. उन्हात बटाटा जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे उन्हात काढणी करणे शक्यतो टाळावे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *