Samruddhi Mahamarg : अहमदनगरला येणार विकासाची गंगा, जिल्ह्यामध्ये होणार 2 कृषी समृध्दी केंद्रे, शेतकऱ्यांना असा होणार फायदा..
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी असा 520 किलोमीटरच्या या पहिल्या टप्प्यातील वाहतूक-दळणवळण सेवेचे 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. समृध्दी महामार्गाची अहमदनगर जिल्ह्यातील लांबी 29.40 किलोमीटर असली तरी याचा जिल्ह्याला खूप फायदा होणार आहे.
या महामार्गातील कोपरगाव इंटरचेंज पासून शिर्डी केवळ 5 किलोमीटर आहे तर अहमदनगर मुख्यालयाचे अंतर 110 किलोमीटर आहे. समृध्दी महामार्गालगत जिल्ह्यात 2 कृषी समृध्दी केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यामुळे शिर्डी व अहमदनगर परिसरातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याची खूप मोठी संधी असणार आहे.
या केंद्रांमुळे कृषी, उद्योग व व्यवसायाला चालना मिळून रोजगार वाढणार आहे. सोबतच समृध्दी महामार्गामुळे शिर्डीत देशविदेशातून येणाऱ्या भाविकांची संख्या देखील वाढणार आहे.
राज्याला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर यासारख्या मोजक्या शहरांचा हातभार लाभला आहे. अहमदनगर जिल्हा कृषी दृष्टया संपन्न जिल्हा आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्याला साखरेचे कोठार देखील म्हणतात.
दळण-वळणाच्या साधनांअभावी जिल्ह्यातील काही भाग विकासापासून वंचित राहिला होता. मात्र आता कृषी समृध्दी केंद्रे शिर्डी परिसर व अहमदनगर जिल्ह्याच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
कशी असतील कृषी समृध्दी केंद्रे :-
अंदाजे 1000 ते 1200 एकर क्षेत्रावर मूलभूत सुविधांनी सुसज्ज अश्या निवासी क्षेत्रासह कृषी आधारित औद्योगिक, उत्पादन व व्यावसायिक केंद्र विकसित करण्यासाठी प्रयतन केला जाईल. आधुनिक शहरी मानकानुसार या केंद्रांचा विकास केला जाईल. यातील निम्मी जमीन निवासी क्षेत्राला, 15% व्यावसायिक क्षेत्राला, 20% अंतर्गत रस्त्यांसाठी, तर 10% ग्रीन झोन म्हणून ठेवण्यात येणार आहे. आणि 5% क्षेत्र सार्वजनिक वापरासाठी असणार आहे.
राहाता तालुक्यातील सावळीविहिर व कोपरगांव तालुक्यातील धोत्रे येथे कृषी समृद्धी केंद्रांची निर्मिती होणार आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची मतही भूमिका असणार आहे. सुमारे एक हजार एकर क्षेत्रावर विकसित केले जाणारे प्रत्येक कृषी समृद्धी केंद्र स्वयंपूर्ण नवनगर असणार आहे. नियोजनबद्ध सार्वभौम विकास हे या नवनगरांचे वैशिष्ट्य असेल.
या नवनगरांमध्ये शेतीला पूरक उद्योग असतील, तसेच औद्योगिक उत्पादनासाठी काही भूखंड देखील राखीव असतील. शाळा, महाविद्यालये, रुग्णालय, मोकळे रस्ते, निवासी इमारती, इत्यादी सुविधा या नवनगरांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
एका कृषी समृद्धी केंद्रात 30 हजार ते 60 हजार अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. त्यामुळे नवनगरांच्या माध्यमातून भविष्यात 15 ते 20 लाख नवीन रोजगारांची संधी निर्माण होणार आहे.
9 जिल्ह्यांशी प्रत्यक्ष व 14 जिल्ह्याशी अप्रत्यक्ष जोडले जाणार अहमदनगर..
समृद्धी महामार्गात अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील 10 गावे येतात. जिल्ह्यातील हा रस्ता धोत्रे ते दर्डे कोऱ्हाळे (29.40 किमी) इतका लांब असणार आहे, तर रस्त्याची रुंदी 120 मीटर इतकी आहे. समृध्दी द्रुतगती मार्गावरील कमल वेग 150 कि.मी./प्रति तास आहे. या द्रुतगती मार्गावरून 100 कि.मी. / प्रतितास वेगाने वाहने धावल्यास मुंबईवरून शिर्डीला पोहचण्यास अवघे दोन तास लागतील तर नागपूरहून शिर्डीला पोहचण्यास 5 तास लागतील.
समृध्दी महामार्गाला अहमदनगरशी जोडणाऱ्या मनमाड-नगर रस्त्याच्या कमला जानेवारी 2023 पासून सुरूवात होणार आहे. हा रस्ता डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातून औद्योगिक तसेच कृषी मालाची वाहतूक विनाअडथळा आणि वेगवान पद्धतीने होऊ शकणार आहे.
समुद्धी आणणार पर्यटन, कृषी समृद्धी केंद्रे आणि रोजगार :-
जिल्ह्यातील शिर्डी, शनि शिंगणापूर, ज्ञानेश्वर मंदीर (नेवासा),देवगड आदी तीर्थस्थळे समृध्दी महामार्गामुळे इतर जिल्ह्यांच्या जवळ येणार आहेत. शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने तर हा रस्ता वरदान ठरणार आहे. त्यामुळे सहाजिकच शिर्डीतील भाविकांच्या संख्येत वाढ होऊन रोजगाराला चालना मिळणार आहे हे नक्की.
सीएनजीचा विनाअडथळा पुरवठा :-
अहमदनगर जिल्ह्याला नेहमीच सीएनजीचा तुटवडा सहन करावा लागत होता. येथे सीएनजीचा टँकरद्वारे पुरवठा होत असतो. त्यामुळे जिल्ह्यात अगदी मोजक्याच पंपावर तास ते दीड तास सीएनजी उपलब्ध असते. समृध्दी महामार्गालगत गॅस अथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून सीएनजी गॅस पाईपलाईन टाकण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याला चोवीस तास पर्यायी नैसर्गिक इंधनाची सोय उपलब्ध झाली आहे.
समृद्धी महामार्गाची वैशिष्टये :-
• द्रुतगती मार्गावरील वाहनांची वेगमर्यादा ताशी : 150 किमी (डिझाइन स्पीड)
• द्रुतगती मार्गाच्या दुतर्फा झाडांची संख्या : साडे बारा लक्ष
• कृषी समृद्धी केंद्रे : 18 एकूण गावांची संख्या : 392
• प्रकल्पाचा अंदाजित खर्च : 55 हजार कोटी रुपये
• एकूण लाभार्थी : 23 हजार 500
• वितरित झालेला मोबदला : 6 हजार 600 कोटी रुपये
• कौशल्य विकास प्रशिक्षणाचे लाभार्थी : 356
• द्रुतगती मार्गालगत सीएनजी/ पीएनजी गॅस वाहिनी : गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया मार्फत
• ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे जाळे
• लांबी 701 किमी
• एकूण जमीन : 8311 हेक्टर
• रुंदी : 120 मीटर
• इंटरवेज : 24
• अंडरपासेस : 700
• उड्डाणपूल : 65
• लहान पूल : 294
• वे साईड अमॅनेटीझ : 32
• रेल्वे ओव्हरब्रीज : 8