पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर ते बिलासपूर दरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला नागपूर रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडा दाखवला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. ही ट्रेन नागपूर ते बिलासपूर दरम्यान धावणार आहे.
तसेच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते नागपुर मेट्रो रेल प्रकल्प फेज – 1 चे लोकार्पणही झालं असून नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या अंतिम दोन मार्गिकांवरील (13.5 किमी) मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. सोबतच नागपूर मेट्रो रेल प्रकल्प फेज – 2 चे कोनशिला अनावरण देखील होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, रावसाहेब दानवे उपस्थित होते.
नागपूर मेट्रो रेल प्रकल्प फेज – 1 :
या प्रकल्पासाठी एकूण 8680 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. नागपूर मेट्रो रेल प्रकल्प फेज – 1 मध्ये नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून शहरवासीयांसाठी अत्याधुनिक मेट्रो सेवा आता उपलब्ध होणार आहे. या मेट्रोमुळे सेंट्रल एव्हेन्यू आणि कामठी मार्गावरील गजबजलेल्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल आणि लोकांना प्रवास करणे सोपे होईल.
सेंट्रल एव्हेन्यूवर मेट्रो सेवा सुरू झाल्याने येथील व्यावसायिकांचे आस्थापने इतर क्षेत्रांशी जोडले जातील. नागपूर मेट्रो रेल प्रकल्प फेज – 1 मुळे शहराच्या दक्षिण भागातील विमानतळ, नागपूर आणि अजनी रेल्वे स्टेशन, बस डेपो आणि अन्य परीसराकरिता दळण वळण सुविधा सुकर होणार आहे.
नागपूर मेट्रो रेल प्रकल्प फेज – 2 :
प्रकल्प खर्च : या प्रकल्पासाठी एकूण प्रस्तावित खर्च 6708 कोटी रुपये असणार आहे. नागपूर मेट्रोचा फेज -1 आणि फेज -2 पूर्ण झाल्यानंतर, नागपूर मेट्रो शहराच्या दोन तृतीयांश आणि इतरही काही महत्त्वाच्या भागांना जोडली जाणार आहे. हिंगना टाउन, बुटीबोरी औद्योगिक क्षेत्र, कामठी आणि कन्हान खाण क्षेत्र, ट्रांसपोर्ट नगर आणि कापसी ही नागपूर मेट्रो फेज -2 शी जोडलेली महत्त्वाची क्षेत्रे असणार आहे.
2031 मध्ये प्रवाशांची संख्या आजच्या तुलनेत 8 पटीने वाढणार असुन हा आकडा सुमारे 22 कोटी होण्याची शक्यता आहे. हा अतिरिक्त भार उचलण्यासाठी मेट्रो प्रशासन कार्यरत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी भगत सिंह कोश्यारी राज्यपाल महाराष्ट्र राज्य, नितिन गडकरी केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक व महामार्ग विभाग भारत सरकार, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
तसेच कृपाल तुमाने खासदार, अनिल देशमुख, काटोल कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, प्रविण दटके, विकास ठाकरे, समीर मेघे, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जैस्वाल, राजू पारवे, टेकचंद सावरकर हे सर्व आमदार या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण डीडी न्यूजवर चालू आहे.
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पात 38.215 किमीचा मेट्रो कॉरिडॉर, 38 स्थानके आणि 2 डेपो असून संपूर्ण स्ट्रेच खालीलप्रमाणे 2 संरेखन किंवा कॉरिडॉरमध्ये विभागला जाणार आहे.
शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्याकरिता ‘फीडर’ सेवा
मेट्रो स्टेशन पासून त्या भागातील शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्याकरिता विविध प्रकारच्या ‘फीडर’ सेवा सुरु करण्यात येणार आहेत. यामध्ये ‘शटल’ बसेस, बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या, पादचारी मार्ग व सायकली, इत्यादी पुरविण्यात येतील. सर्व स्टेशन्सला जोडणाऱ्या एकूण 19 ‘फीडर’ मार्ग असतील ज्याची एकूण लांबी 160 किमी असेल. ‘फीडर’ सेवेमुळे सर्व सामान्य जनतेला मेट्रो पर्यंत पोहोचण्याचा त्रास होणार नाही..