तब्बल 24 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या फलटण ते बारामती रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. यापैकी 37.20 किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग बारामती तालुक्यातून जातो मात्र. यासाठी बारामती तालुक्यातील 13 गावांतील खासगी जमिनीचे भूसंपादन करण्यात येत आहे. परंतु या भागातील काही जमीनमालक जमीन देण्यास विरोध करत आहेत. अश्या जमिनींचे सक्तीने संपादन करण्याचा निर्णय अखेर रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यादृष्टीने बारामती तालुक्यात हालचाली सुरू झाल्या आहेत.

लोणंद- फलटण- बारामती हा 63 किमीचा रेल्वे मार्ग दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा दुवा ठरणार आहे. या मार्गाचे काम पूर्ण झाल्यास रेल्वेला खूप मोठा फायदा होणार आहे. हा मार्ग व्हावा यासाठी दिवंगत माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी जंग जंग पछाडून 1998 साली या मार्गासाठी मंजुरी मिळवली होती. हा मार्ग रेल्वे मंत्रालयाच्या दृष्टीने महत्वाचा असल्याने तो पूर्णत्वास जावा म्हणून रेल्वे विभागसुद्धा प्रयत्नशील आहे.

लोणंद ते फलटण या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण होऊन या मार्गावर प्रत्यक्ष रेल्वे देखील सुरू झालेली आहे. मात्र, फलटण ते बारामती रेल्वे मार्गाचे रखडले होते. या प्रकल्पातील मार्गाचा काही भाग हा वन खात्याच्या जागेतून जात होता त्यामुळे भूसंपादनात मोठी अडचण येत होती. त्यामुळे हे काम नवीन प्लॅननुसार सुरू करण्यात आले होते.

याला बारामती तालुक्यातील लोकप्रतिनिधी व ज्यांच्या जमिनीतून मार्ग जाणार आहे अश्या जमीन मालकांनीसुद्धा परवानगी दिल्याने फलटण ते बारामती रेल्वे मार्गाचे भूसंपादनाचे काम तातडीने सुरू करण्यात आले.

या अश्या परिस्थितीत फलटण तालुक्यातील भूसंपादन पूर्ण होत होऊन बारामती तालुक्यातील सुद्धा जवळपास 85 टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, काही जमीन मालकांनी पुन्हा विरोध सुरू केल्याने सध्या कामात शिथिलता आली आहे.

या मार्गासाठी आतापर्यंत 131 हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. मात्र संपादन न झालेल्या 40 हेक्टर जमिनीचे सक्तीने संपादन करण्याचा प्रस्ताव पुणे जिल्हा प्रशासनाने रेल्वे प्रशासनाकडे दिल्याची माहिती आता समोर येत आहे.

हे सक्तीचे संपादन लवकरात लवकर सुरु व्हावे यासाठी बारामती प्रांताधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाला प्रस्ताव दिला आहे. यासाठी त्यांची भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्तीही करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच भूसंपादनाचे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. हे काम पूर्ण झाल्यावर या मार्गावर प्रत्यक्ष लाइन टाकून फलटण ते बारामती रेल्वे सुरू करण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनामध्ये कमालीची उत्सुकता आहे.

फलटण ते बारामती आणि फलटण ते पंढरपूर हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर प्रवाश्यांसाठी उपलब्ध व्हावा यासाठी मार्गाचे भूसंपादनाचे काम तातडीने मार्गी लागावे, म्हणून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नुकतीच रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने भूसंपादनाच्या कार्यात गती आणली असल्याचे दिसत आहे.

आतापर्यंत किती जमिनीचे झाले आहे संपादन :-

या संपूर्ण रेल्वे मार्गापैकी एकूण 37.20 किमी रेल्वेमार्ग एकट्या बारामती तालुक्यातून जातो. या मार्गासाठी बारामती तालुक्यातील काही गावांमधील खासगी जागा संपादित करण्याची प्रक्रिया पार पडली असून, या मार्गासाठी 176 हेक्टरपैकी 121 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे, तर काही दिवसांतच राहिलेल्या 9.68 हेक्टर एवढ्या जमिनीची देखील खरेदी होईल. त्यामुळे 131 हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.

मात्र, उर्वरित 40 हेक्टर क्षेत्र संपादन करण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून विरोध होत असल्यामुळे ही जमीन सक्तीने संपादन करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे पुढे काय होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

बाजारभावाच्या पाच पट मिळणार दर..

बारामती- लोणंद- फलटण रेल्वे मार्गासाठी जमीनमालकांना सध्याच्या बाजारभावापेक्षा पाचपट जादा दर मिळत आहे. परंतु तरीही आपल्या जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शवत आहे. परंतु आता सक्तीने जमीनखरेदीची प्रक्रिया होणार आहे. या रेल्वे मार्गांच्या जमीन खरेदीसाठी 126 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *