यंदा मान्सून चांगला बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कृषी विभागाने सहा लाख २८ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज वर्तविला आहे. या खरीप हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ५९६.३६ कोटींचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
दि. १ एप्रिलपासून पीककर्ज वाटपास सुरुवात झाली असून, आतापर्यंत २५३.२१ कोटींचे पीककर्ज वाटप झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील कर्जवाटपाचे हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ४० टक्के आहे. आतापर्यंत सर्वाधिक कर्ज निफाड तालुक्यात, तर सर्वांत कमी कर्ज त्र्यंबकेश्वर तालुक्यात वाटप झाले आहे.
जिल्ह्यात मागील पाच दिवसांतच जून महिन्यातील सरासरीच्या ५० टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे दि. १ ते १० जूनच्या कालावधीत १२०१ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. त्यात २५ हेक्टर ज्वारी, १०५ हेक्टर मका, १०७१ हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी झाली आहे. त्यामुळे खरिपासाठीचे पीककर्ज वितरणही जिल्हा बँकेसह अन्य बँकाकडून केले जात आहे.
जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामासाठी ६२८. ०६ कोटींच्या कर्जवाटपाचा लक्ष्यांक निश्चित करण्यात आला आहे. गतवर्षी हा लक्ष्यांक ६१५ कोटींचा होता. यंदा त्यात काहीशी वाढ झाली आहे. यात खरिपासाठी ५९६.३६ कोटींचे उद्दिष्ट आहे, तर रब्बी हंगामासाठी ३१.७० कोटींचे उद्दिष्ट आहे.
खरीप हंगामासाठी १ एप्रिल २०२४ पासून कर्जवाटप सुरू झाले असून, आतापर्यंत एकूण २३ हजार २४ हेक्टर क्षेत्रासाठी २६ हजार ३३३ शेतकऱ्यांना १५ मेअखेर २५३.२१ कोटींचे कर्जवाटप झाले आहे. खरिपासाठी सरासरी ४२ टक्के कर्जवाटप झाले आहे.
कर्ज मागणी वाढणार..
जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईचे गंभीर संकट आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यातच मान्सून अद्याप महाराष्ट्रात दाखल झालेला नाही. यंदा समाधानकारक मान्सूनचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे पीककर्ज मागणी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना येत्या ३० सप्टेंबरपर्यंत पीककर्ज घेता येणार आहे.
खरीप पीककर्ज दृष्टिक्षेपात..
» एकूण उद्दिष्ट : ५९६.३६ कोटी
» आतापर्यत झालेले वाटप : २५३ कोटी २२ लाख
» लाभ घेतलेले एकूण शेतकरी : २६ हजार ३३३
» पीककर्जाचा लाभ झालेले क्षेत्र : २३ हजार हेक्टर
तालुकानिहाय मे अखेरपर्यंतचे कर्जवाटप..
निफाड – ७९.२५ कोटी, येवला – ३५.८४ कोटी, मालेगाव – २३.३२ लाख, देवळा – १०.१६ लाख, इगतपुरी – २३.९९ लाख, कळवण – ०८. ५५ लाख, दिंडोरी – २३.९९ लाख, नांदगाव – १०.०५ लाख, नाशिक-२०.०८ लाख, पेठ – २२ लाख, सटाणा – १६.१४ लाख, चांदवड – १५.५० लाख, सिन्नर – ८.८९ लाख, त्र्यंबकेश्वर – ०१, ८५ लाख