शेतीशिवार टीम : 19 सप्टेंबर 2022 :- रेशीम शेतीमध्ये प्रगती करत जालना जिल्ह्याने राज्यात प्रथक क्रमांक मिळविला आहे. नागपूर येथील धनंजयराव गाडगीळ सभागृहात नुकत्याच आयोजित कार्यशाळेत जिल्ह्याला रेशीमरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच तीन शेतकऱ्यांचाही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यशाळेस नागपूरच्या विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे, प्रदीप चंद्रन, उपसंचालक दिलीप हाके व महेंद्र ढवळे, केंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ, तसेच राज्यातील रेशीम कार्यालयाचे रेशीम विकास अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सुरूवातीस महाराष्ट्र राज्यामध्ये रेशीम कोष उत्पादन तुती नर्सरी पुरवठा धारक, चॉकी किटक संगोपन पुरवठाधारक, रिलींग मशीन सुत उत्पादक या वेगवेगळ्या प्रक्रीया क्षेत्रामध्ये विभाग स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकरी व उद्योजक यांचा’ रेशीमरत्न’ पुरस्कार देऊन डॉ. माधवी खोडे, राज्याचे रेशीम संचालक, प्रदीप चंद्रन यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमामध्ये राज्यात तसेच मराठवाडा विभागामध्ये जालना जिल्ह्यातील शेतकरी व उद्योजक यांनी रेशीम कोष उत्पादन, चॉकी किटक संगोपन पुरवठा धारक, टोमॅटीक रिलींग मशीन सूत उत्पादक या तिन्ही क्षेत्रामध्ये ‘ रेशीमरत्न पुरस्कार मिळवून नवीन रेकॉर्ड प्रस्थापीत केले आहे.

जिल्ह्यातील मच्छींद्रनाथ चिंचोली (ता.घनसवांगी) येथील रेशीम उत्पादक शेतकरी भाऊसाहेब दत्ता निवदे यांनी पाच एकर तुती लागवडीमधून रेशीम कोष विक्रीतून 23 लाखाचे उत्पादन घेतले असून, ते राज्यात सर्वाधिक रेशीम उत्पादन शेतकरी ठरले आहेत.चॉकी किटक संगोपनामध्ये कचरेवाडी येथील चॉकी केंद्र चालक, विजय पाटील यांना ‘रेशीमरत्न’ पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आहे.

रेशीम सूत उत्पादनामध्ये जिल्हयात एप्रील 2018 मध्ये दिशा सिल्क इंडस्ट्रीज या नावाने महाराष्ट्र राज्यातील पहीले टोमॅटीक रिलींग मशीनची उभारणी करून जागतिक दर्जाचे चार-अ रेशीम सूत अत्पादन केलं आहे, तसेच कोविड कालावधीत जेंव्हा शेतकऱ्यांना कोष विक्रीस अडचण झाली होती. त्याकाळी दिशा सिल्क इंडस्ट्रीजने सर्व शेतकऱ्यांचे कोष खरेदी करून दिलासा दिला.

यामुळे दिशा सिल्कचे व्यवस्थापक, सूरज टोपे यांना ‘रेशीमरत्न’ पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. जिल्ह्यास तीन पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी शेतकरी भाऊसाहेब निवदे, तसेच उद्योजक विजय पाटील व सुरज टोपे जिल्हा रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *