खुशखबर! राज्यात 3.87 लाख विहिरीचं टेंडर, मागेल त्याला विहिरीसाठी मिळणार 4 लाख रु., अंतराची अटही रद्द; पहा GR, PDF फॉर्म अन् अर्ज प्रोसेस
राज्य व केंद्र शासनाअंतर्गत राबवण्यात येणारी (Mahatma Gandhi NREGA) नरेगा सिंचन विहीर अनुदान योजना आता ‘मागेल त्याला विहीर अनुदान योजना’ झाली आहे. आता या योजनेअंतर्गत 4 लाख रुपये अनुदान, अंतराची अट रद्द, प्रत्येकाला अर्ज करता येणार अशा प्रकारच्या नव्या बदलास आता ही ‘विहीर अनुदान योजना’ राबवली जाणार आहे. या संदर्भातील नवीन शासन निर्णय, नवीन मार्गदर्शक सूचना या राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आल्या आहेत.
आज आपण या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? अर्जाचा नमुना, दिलं जाणारं अनुदान, लाभार्थ्याची निवड, पात्रता, या योजनेसाठी लागणारी जमीन या सर्वा -संबंधित सविस्तर माहिती आपण शेतीशिवारच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सर्वांना विनंती आहे की, माहिती अतिशय महत्त्वपूर्ण माहिती सर्वांच्या कामाची आहे. त्यामुळे लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
आपण सर्वाना माहीतच आहे की, NREGA च्या माध्यमातून ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध – गाव समृद्ध तर तालुका समृद्ध – तालुका समृद्ध तर जिल्हा समृद्ध – जिल्हा समृद्ध तर राज्य समृद्ध. . अर्थातच राज्य समृद्ध करण्यासाठी शेतकरी समृद्ध होणं अतिशय गरजेचं आहे, आणि याचं दृष्टिकोनातून विविध योजना बदलल्या जात आहे अन् आता या योजनेमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे.
आपण जर पाहिलं तर, 2020 च्या परिपत्रकानुसार गावाच्या लोकसंख्येनुसार विहिरींची संख्या निर्धारित करण्यात आलेली होती, आणि ज्या गावाची लोकसंख्या जास्त असेल त्या गावाला विहिरी जास्त अन् ज्या गावाची लोकसंख्या कमी असेल त्या गावाला कमी विहिरी अशा प्रकारचे बदल करण्यात आले होते. तसेच अंतराची अट, 60:40 चा रेशो अशा जाचक अटी घालून ही योजना प्रभावीपणे राबवली जात नव्हती. यामुळे लक्षांक पूर्ण होत नव्हते आणि आजच्या स्थितीत राज्यात 3 लाख 87 हजारांपेक्षा जास्त विहिरी खोदल्या जाऊ शकतात अशा प्रकारचा शासनाचा टेंडर समोर आला आहे. त्यामुळे आता हे योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी नव्या शासन निर्णयांसह GR निर्गमित करण्यात आला आहे.
शासन निर्णय :-
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींची कामे करतांना अधिनस्त कार्यालयास येत असलेल्या अडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने सिंचन विहिरींसंदर्भात पुढील सुधारित मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत .
1. लाभधारकाची निवड : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या तरतुदीनुसार खालील प्रवर्गासाठी प्राधान्यक्रमाने सिंचन सुविधा म्हणून विहिरीची कामे अनुज्ञेय आहेत.
अनुसूचित जाती
अनुसूचित जमाती
निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती)
दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
स्त्री – कर्ता असलेली कुटुंबे
शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटूंबे
जमीन सुधारणांचे लाभार्थी
इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी
अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम 2006 (2007 चा 2) खालील लाभार्थी
सिमांत शेतकरी (2.5 एकर पर्यंत भूधारणा)
लाभधारकाची पात्रता
• लाभधारकाकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असावे.
• महाराष्ट्र भुजल (पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम 1993 च्या कलम 3 नुसार अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या 500 मीटर परिसरात नवीन विहिर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या 500 मीटर परिसरात सिंचन विहिर अनुज्ञेय करु नये.
• महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून 150 मी. अंतराची अट लागू राहणार नाही.
• एकापेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील मात्र त्यांचे एकूण सलग जमीनीचे क्षेत्र 0.40 हेक्टर पेक्षा जास्त असावे.
• ज्या लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कार्डधारक असला पाहिजे.
• लाभधारकाच्या 7 / 12 वर याआधीच विहीरीची नोंद असू नये.
• लाभधारकाकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा.
• दोन सिंचन विहिरींमधील 150 मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही.
• दोन सिंचन विहिरीमधील किमान 150 मीटर अंतराची अट ही Run off Zone तसेच, अनुसूचित जाती व जमाती व दारिद्रय रेषेखालील कुटुंब यांकरिता लागू करण्यात येऊ नये.
आर्थिक मर्यादा अनुदान :-
अंदाजपत्रकासाठी संबंधित जिल्हयाच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून विहिरींची मापे निश्चित करून घ्यावीत. सध्याच्या किमतीत झालेली सर्वसाधारण वाढ विचारात घेवून शासन निर्णय घेऊन विहीरीच्या किमतीची कमाल मर्यादा 3 लाखावरुन 4 लाख रुपये केली आहे.
विहिर कोठे खोदावी :-
1) दोन नाल्यांच्या मधिल क्षेत्रात व नाल्यांचे संगमाजवळ जेथे मातीचा किमान 30 से.मी. चा थर व किमान 5 मीटर खोलीपर्यंत मऊ (झिजलेला खडक) आढळतो तेथे.
2) नदी व नाल्या जवळील उथळ गाळाच्या प्रदेशात.
3. जमिनीच्या सखल भागात जेथे किमान 30 से.मी. पर्यंत मातीचा थर व किमान 5 मीटर खोली पर्यंत मुरुम (झिजलेला खडक) आढळतो .
4. नाल्याच्या तिरावर जेथे उंचवटा आहे तेथे, परंतु सदर उंचावर चोपण किंवा चिकण माती नसावी.
5. घनदाट व गर्द पानांच्या झाडांच्या प्रदेशात.
6. नदी नाल्याचे जुने प्रवाह पात्र जेथे आता नदी पात्र नसतांना देखील वाळु, रेती व गारगोट्या थर दिसून येते.
7. नदीचे / नाल्याचे गोलाकार वळणाच्या आतील भूभाग.
8. अचानक दमट वाटणाऱ्या अथवा असणाऱ्या जागेत,
विहीर कोठे खोदू नये :-
1 भूपृष्ठावर कडक खडक दिसणाऱ्या जागेत.
2 . डोंगराचा कड़ा व आसपासचे 150 मीटरचे अंतरात.
3. मातीचा थर 30 से.मी. पेक्षा कमी असणाऱ्या भूभागात.
4. मुरमाची (झिजलेला खडक) खोली 5 मीटर पेक्षा कमी असणाऱ्या भूभागात. ( मुरुमाची खोली सर्वसाधारणपणे अस्तित्वात असलेल्या जवळपासच्या विहिरीत डोकावले असता समजते. आसपास विहीर नसल्यास जवळच्या नदी / नाल्याच्या काठावरुन मुरुमाची खोलीचा अंदाज मिळू शकतो.)
अर्ज कुठे आणि कसा करायचा ?
01 डिसेंबर पासून ते 31 जानेवारीपर्यंत 2024 पर्यंत आपण या योजनेसाठी अर्ज करू शकता. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असल्याने तो तुम्हाला PDF फाईलमध्ये डाउनलोड करायचा आहे. आणि अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे जोडून 01 डिसेंबर आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात सबमिट करायचा आहे..