Take a fresh look at your lifestyle.

राज्यातील 8 लाख शेतकऱ्यांसाठी वाईट बातमी! 50,000 रु. अनुदानाच्या दुसऱ्या यादीची आता 2 महिने पाहावी लागणार वाट..

0

राज्यातील कर्जमाफी योजनेंतर्गत 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र ठरलेल्या अन् दुसऱ्या यादीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सुमारे 8 ते 12 लाख शेतकऱ्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे.

राज्यातील 7751 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने जिल्ह्यात आचारसंहिता सुरु झाली आहे. याचा फटका कर्जमाफी योजनेंतर्गत प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र ठरलेल्या दुसऱ्या यादीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना बसणार आहे. या शेतकऱ्यांची दुसरी निवड यादी आचारसंहितेमुळे आता लांबणीवर पडणार आहे . सुमारे दोन महिने या शेतकऱ्यांना अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती 2019 प्रथम योजना शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात आले. मात्र थकबाकीदारांना कर्जमाफी देताना शासनाने नियमित कर्ज परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याने राज्याच्या विविध भागात शेतकरी संघटनांनी आंदोलन केले होते. काही ठिकाणी विकास सोसायट्यांना टाळे ठोकून तत्कालिन महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची वाढती नाराजी लक्षात घेत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात शासनाने नियमित कर्जदारांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याच्या योजनेची घोषणा केली. यासाठी शासनाच्या अंदाजपत्रकात निधीची तरतूद करण्यात आली. मात्र अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष झाले होते.

दरम्यान, राज्यात सत्तांतर होवून शिंदे – फडणवीस सरकारने या योजनेची अंमलबजावणी सुरु केली. तसेच आघाडी सरकारच्या काळात काही निकष बदलले. महापुराचे अनुदान घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्यात आला तसेच तीन वर्षात सलग नव्हे तर कोणत्याही दोन वर्षात कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना यासाठी पात्र ठरवण्यात आले. त्यामुळे लाभार्थीची संख्या वाढली.

शिंदे- फडणवीस सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देत त्यांची त्या दिवशी गोड करण्याचा निर्णय घेतला. अनुदानासाठी सांगली जिल्ह्यातील 1 लाख 60 हजार 795 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांची माहिती शासनाने पोर्टलवर अपलोड केली आहे. त्यातील 62 हजार 642 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करत या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्यात आला.

यातील 55 हजार शेतकऱ्यांना अनुदानाचे 185 कोटी रुपये त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले. पहिल्या यादीतील आधार प्रमाणीकरण न झालेले 1 हजार 261 शेतकऱ्यासह पहिल्या यादीतील अन्य काही शेतकरी अद्याप अनुदानापासून वंचित आहेत. यासाठी आवश्यक ती ऑनलाईन सुविधा शासनाने अद्याप उपलब्ध न केल्याने या तक्रारी प्रलंबित आहे. लवकरच त्या निकाली काढण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सांगितले.

दिवाळीनंतर पात्र सुमारे 1 लाख शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर होणार होती. यासाठी गेली काही दिवस शेतकरी प्रतिक्षा करत होते. मात्र आता ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने दुसरी यादी आचारसंहितेत अडकली आहे.

आचारसंहितेच्या काळात लाभार्थ्यांचा कोणताही शासकीय लाभ देता येत नाही. त्यामुळे ही यादी आता ग्रामपंचायत निवडणूक संपल्यानंतरच जाहीर होणार आहे. यासाठी सुमारे दोन महिने प्रतिक्षा करावी लागणार आहे. जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांना आचारसंहितेचा फटका बसणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.