शेतीशिवार टीम, 15 जानेवारी 2022 : मार्केट यार्ड येथील एका दुकानातील लिफ्ट चौथ्या मजल्यावरुन खाली कोसळल्यामुळे 19 वर्षीय तरुण जागीच ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.15) दुपारच्या सुमारास घडली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.
शिवम भाऊसाहेब झेंडे (वय 19) असे मयत युवकाचे नाव आहे. या अपघातात ओंकार अरूण निमसे (वय 19), प्रिया सचिन पवार (वय 40) व शीतल शेषेराव चिमखडे (वय 24) हे गंभीर जखमी झाले आहेत.
स्टेशन रस्त्यावरील मार्केट यार्ड परिसरात बाजार समितीच्या आवारातच अभय मशिनरी नावाचे तीन ते चार मजली दुकान आहे. या दुकानात लिफ्टही बसविण्यात आलेली आहे.
शनिवारी दुपारच्या सुमारास ही लिफ्ट चौथ्या मजल्यावरुन खाली कोसळली. यात लिफ्टमधील 19 वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे. तर तीन जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तिघा जखमींपैकी एकास शासकीय रुग्णालयात, तर दोघांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
दरम्यान, मार्केट यार्ड मधील बहुतांशी इमारतींची बांधकामे अनधिकृत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे घटना घडलेल्या इमारतीला महापालिकेची बांधकाम परवानगी होती का?
इमारतीमध्ये लिफ्ट बसविणार्या कंपनीने परवानग्या तपासल्या होत्या का ? घटना नेमकी कशामुळे घडली? असे सवाल या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.