Take a fresh look at your lifestyle.

परतीच्या पाऊसग्रस्तांना मोठा दिलासा, पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश ; हेक्टरी अशी मिळणार मदत !

0

राज्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईपोटी आतापर्यंत 4 हजार 700 कोटी रुपयांची वाढीव दराने मदत दिल्यानंतर आता ऑक्टोबर 2022 मध्ये परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीसाठीसुद्धा मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करता यावी यासाठी प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत, असे निर्देशही शिंदे यांनी दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. ऑक्टोबरमधील पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 25 लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. आजपर्यंत कधीही सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जात नव्हती.

मात्र आमच्या सरकारने प्रथमच अशा शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता दिलासा देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी सुमारे 750 कोटी रुपये इतके वाटप करण्यात आले आहे.

ऑक्टोबर महिन्यात झालेला सततचा पाऊस आणि नुकसानीसाठी हेच निर्णय लागू करण्यात येणार आहेत, असे शिंदे यांनी सांगितले. ऑक्टोबर 2022 मधील या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता देखील राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दुप्पट दराने 2 हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्याचे शासनाकडून आश्वासित करण्यात येत आहे.

आम्ही महसूल आणि कृषी विभागाला निर्देश दिले होते, त्याप्रमाणे सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगाने सुरू असून यासंदर्भात प्रशासनाला सूचना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

40 लाख शेतकऱ्यांना 5 हजार कोटींची मदत

मदत व पुनर्वसन विभागाने माहिती दिल्याप्रमाणे जून – जुलैपासून सुरू असलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या 40 लाख 15 हजार 847 शेतकऱ्यांना 4700 कोटींची मदत करण्यात आली आहे. ही मदत एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुपटीने जास्त व दोनऐवजी तीन हेक्टर अशी वाढीव आहे.

या पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही अंतिम टप्यात आहे. लवकर याबाबत विहित नमुन्यात शासनास निधी मागणीचे प्रस्ताव प्राप्त होतील. सरकार शेतकऱ्यांप्रति संवेदनशील असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतीपिकांच्या नुकसानीची दखल घेण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.