शेतीशिवार टीम, 5 डिसेंबर 2021 : मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधश्रद्धेपोटी एका पित्याने आपल्याच मुलाची क्रूर हत्या केली आहे . निर्दयी पित्यानेहा निष्पापाचे कुऱ्हाडीने सात तुकडे केले.
अलीराजपूर जिल्ह्यातील खरखडी गावात गुरुवारी दुपारी ही घटना घडली. आरोपी 28 वर्षीय दिनेश डावर याने आपल्या मुलावर कुऱ्हाडीने वार करून त्याचे सात तुकडे केले.
आपला मुलगा कुटुंबासाठी अशुभ असल्याची भीती दिनेशला वाटत होती. दिनेशच्या मनात पक्क बसलं होतं की, आपला मुलगा सैतान आहे आणि त्यामुळेच त्याच्या कुटुंबावर वाईट गोष्टी घडत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलाची निर्घृण हत्या केल्यानंतर आरोपी दिनेशने त्याला घरासमोरील जमिनीत गाडलं. त्याला पुरत असताना गावच्या सरपंचाची नजर त्याच्यावर पडली. सरपंचाने पोलिसांना माहिती दिल्याने हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी मृताचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. चौकशीत या घटनेत एका तरुणाने दिनेशला मदत केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केली आहे. तर दुसऱ्या फरार आरोपीचा शोध सुरू आहे.