व्वा रं पठ्ठ्या ! देशी दारूच्या 90 मिलीच्या फवारणीने पीक झाले झिंगाट; युट्युबवर शोधला रामबाण उपाय, परिसरात सर्वत्र चर्चा..
दारूमुळे होणारे दुष्परिणाम हे आपल्याला सर्वत्रच बघायला मिळतात. मात्र, भंडारा जिल्ह्यातील एका पठ्ठयाने चक्क धान पिकाच्या नर्सरीवर देशी दारूची फवारणी करत पह्यांना रोगमुक्त केले असल्याचे समोर आले आहे. लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील एका शेतकऱ्याने दारूचा विधायक वापर केला आहे. भातपिकावर फवारणीसाठी चक्क दारूचा वापर केला आहे.
फवारणीसाठी दारूचा वापर केल्याने पिकाला फायदा झाला असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. परिसरात सध्या उन्हाळी धान रोवणीसाठी असलेल्या नर्सरीची देखभाल सुरू आहे. वातावरणातील धुके पडण्याचे प्रमाण वाढल्याने धानाचे पन्हे पिवळे पडून कीडग्रस्त होत असल्याचे दिसून येत आहे.
मात्र, रामदास गोंदोळे या युवा शेतकऱ्याने शेतात चक्क देशी दारूची फवारणी करीत पीक रोगमुक्त केले आहे. आता तुम्ही म्हणाल, फवारणीत काय वेगळे ? होय, फवारणीसाठी म्हणून वापरले जाणारे कीटकनाशक आगळेवेगळे आहे. हे कीटकनाशक आहे देशी दारू, देशी दारूचा भातपिकावर फवारणीसाठी वापर केल्याचे सांगत आहेत रामदास गोंदोळे.
त्यांनी एक पंप फवारणीसाठी देशी दारूची नव्वद मिलीची बाटली आणि सोबत एक पाव युरिया यांची फवारणी केल्याने धानाची रोपे टवटवीत झाली आहेत. त्यामुळे पिकाची चांगली वाढ होऊन रोवणीयोग्य झाली आहेत.
कृषी विभागासाठी प्रयोग नवे नाहीत. पण, कोणत्याही कृषी विद्यापीठाने पिकांवरील मद्यप्रयोगाला अधिकृत परवानगी दिलेली नाही. हा मद्यप्रयोग परिणामकारक असल्याचे कृषी शास्त्रज्ञ सांगत आहेत.
‘यू ट्यूब’चा उपयोग करून घेतली माहिती..
उन्हाळी धान पिकाची नर्सरी दरवर्षी गारव्यामुळे कोमेजून जात होती. अनेक महागड्या औषधांची फवारणी करूनही पाहिजे तसा परिणाम दिसून येत नव्हता. यासाठी रामदास गौदोळे यांनी मोबाइलमधील ‘यू ट्यूब’चा उपयोग करून देशी दारूची फवारणी केल्याने पीक जोमात येत आल्याची माहिती घेतली व देशी दारूची खरेदी करून फवारणी केली.
झालेले परिणाम अचंबित करणारे होते. फवारणी केल्यानंतर चार – पाच दिवसांत धानपीक हिरवेगार झाल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. आता हा प्रयोग अनेक शेतकरी करताना दिसत आहेत.
धानाची नर्सरी थंडी वाढल्यामुळे पिवळी पडून वाढ थांबली होती. यासाठी इतर फवारण्या केल्या. मात्र, सुधारणा झाली नाही. देशी दारू व युरिया खताची फवारणी करताय काही दिवसांत नर्सरी हिरवीगार होऊन रोवणी योग्य झाली आहे. – रामदास गोंदोळे शेतकरी, जेवनाळा