सोनं दरवाढीचा ऐतिहासिक विक्रम..! लग्नसराईच्या तोंडावर सोनं पोहचलं 60 हजारांवर, पहा सोने-चांदीचे आजचे दर..
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सोने आणि इमिटेशन ज्वेलरीवरील सीमाशुल्क 20 टक्क्यांवरून 25 टक्के, चांदीवरील 7.5 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. त्यामुळे सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत.
10 ग्रॅम सोन्याचा दर 60 हजारांच्या घरात पोहोचला आहे. तसेच केंद्रीय बँकांकडून सोन्याची खरेदी वाढली आहे. या कारणाने इतिहासात प्रथमच सोन्याला उच्चांकी दर मिळाले आहेत.
देशभरात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असताना सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सामान्य माणसाला त्याचा फटका बसत आहे. त्यातच 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर (2 फेब्रुवारी) सोन्याचे भावही गगनाला भिडले आहेत. सोने, चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत जोरदार उसळी पाहायला मिळत असून सोन्याचा 10 ग्रॅम सोन्याचा दर 60 हजारांच्या दरम्यान पोहोचला आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, सोने 779 रुपयांच्या वाढीनंतर 58 हजार 689 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. याआधी बुधवारी सोन्याचा भाव 57 हजार 910 रुपयांवर बंद झाला होता. तर, दुसरीकडे चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली असून सराफा बाजारात चांदी 1 हजार 805 रुपयांनी महागली आहे. आता चांदी 71 हजार 250 रुपये किलोवर पोहोचली आहे. 1 फेब्रुवारी रोजी चांदीचे दर 69 हजार 445 प्रति किलो होते.
या कारणांमुळे वाढले सोन्याचे दर..
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात अर्ध्या टक्क्याची वाढ अपेक्षित होती. प्रत्यक्षात ती पाव टक्का झाली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात बुधवारी मध्यरात्री सोन्याचा प्रति औंस भाव 1925 डॉलर होता व तो गुरुवारी सकाळी 1950 डॉलरवर गेला. याच वेळी रुपया डॉलरच्या तुलनेत 81.70 वरून घसरून 82.25 च्या पातळीवर गेला. बजेटमध्ये सोन्यावरील करांमध्ये घट होण्याची अपेक्षा होती.
प्रत्यक्षात सोन्यावरील एकूण कर पूर्वीएवढा म्हणजे पंधरा टक्केच राहिला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पापूर्वी घाऊक व्यापारी बाजारामध्ये ‘डिस्काउंट’ वर चालणारे सोने भावाच्या बाबतीत ‘प्रीमियम’ ठरले. या साऱ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून भारतात सोने भावात तेजी येऊन ते प्रति दहा ग्रॅम 61 हजार रुपयांचा टप्पा पार केला. – अमित मोडक, संचालक – सीईओ , पीएनजी सन्स