Indian Railways : भारतात दररोज करोडो लोक रेल्वेने प्रवास करतात. भारताचे रेल्वे नेटवर्क हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. अशा परिस्थितीत, भारतीय रेल्वेशी संबंधित अशा अनेक मजेदार किस्से आहेत, जे अजूनही लोकांना माहित नाहीत.

आज आपण भारतातील अशा अनोख्या रेल्वे स्टेशनबद्दल जाणून घेणार आहोत..जे दोन राज्यांमध्ये येते. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर रेल्वे स्टेशन हे एक अनोखं रेल्वे स्टेशन आहे, ज्याचा एक भाग गुजरातच्या तापी जिल्ह्यात आहे आणि दुसरा भाग महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यात आहे.

भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीत येणारे नवापूर रेल्वे स्थानक हे गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेला एकत्रितपणे स्पर्श करणारे एकमेव रेल्वे स्टेशन आहे.

का विभागलं गेलं 2 राज्यात..

नवापूर रेल्वे स्टेशनचे 2 राज्यात विभाजन होण्यामागे एक कथा आहे. वास्तविक, हे स्टेशन बांधले तेव्हा महाराष्ट्र आणि गुजरातचे विभाजन झालेलं नव्हतं, तर 1 मे 1961 रोजी मुंबई प्रांताचे विभाजन झाल्यावर महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्यांमध्ये विभागणी करण्यात आली. या फाळणीत नवापूर स्टेशन दोन राज्यांच्या मध्ये आले आणि तेव्हापासून त्याची वेगळी ओळख आहे.

2 राज्यांच्या मध्येच बेंच..

नवापूर रेल्वे स्टेशनवरही एक बेंच आहे, त्यातील अर्धा महाराष्ट्रात आणि अर्धा गुजरातमध्ये आहे. या बाकावर बसणाऱ्यांनी आपण कोणत्या राज्यात बसलो आहोत, याचे भान ठेवावे लागेल, या स्टेशनवर एक सेल्फी पॉइंट बनवण्यात आला आहे, जिथे लोक दूर – दूरवरून फोटो काढण्यासाठी येतात.

चार भाषांमध्ये केली जाते घोषणा..

दोन राज्यांमध्ये विभागलेल्या या स्टेशनची तिकीट विंडो महाराष्ट्रात येते, तर स्टेशन मास्तर गुजरातमध्ये बसतात. इतकेच नाही तर या स्थानकावर चार वेगवेगळ्या भाषांमध्ये घोषणा आहेत. स्टेशनवरील माहितीही हिंदी, गुजराती, इंग्रजी आणि मराठी या चार भाषांमध्ये लिहिलेली आहे. जे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांना समजण्यास सोपे आहे.

नवापूर रेल्वे स्टेशनची एकूण लांबी 800 मीटर आहे, त्यापैकी 300 मीटर महाराष्ट्रात आणि 500 ​​मीटर गुजरातमध्ये येतात. या स्टेशनला तीन प्लॅटफॉर्म आणि चार रेल्वे ट्रॅक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *