शेतीशिवार टीम, 20 जानेवारी 2022 : पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाल्यानंतर त्रिशंकू अवस्थेत असलेल्या नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांनी महाविकास आघाडी सरकारचा घटक पक्ष समजल्या जाणाऱ्या शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवत बहुमताचा आकडा पार केला आहे.
सत्तास्थापनेसाठी शिवसेनेशी आघाडी करण्या संदर्भात वरिष्ठ पातळीवरून निलेश लंकेना मुंबईतून फोन येत होते परंतु शिवसेनेला बरोबर घेण्यास राष्ट्रवादी नगरसेवकांचा विरोध असल्याने निलेश लंके यांच्या राजकीय कार्यकुशलता पुनश्च एकदा सिद्ध झाली असून शहर विकास आघाडीच्या दोन नगरसेवक हे गळाला लागल्याने बहुमतासाठी लागणारी ‘मॅजिक फिगर’ जुळली आहे. त्यामुळे तब्बल 15 वर्षानंतर पारनेर नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार आहे.
प्रभाग क्रमांक 10 च्या नवनिर्वाचित नगरसेविका सुरेखा अर्जुन भालेकर व भूषण उत्तम शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार निलेश लंके, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या उपस्थितीत शहर विकास आघाडीच्या दोन नगरसेवकांचे राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश झाल्याने आ. लंके जे बोलले ते त्यांनी करून दाखवलं.
आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यांनतर निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ नगरसेवकांची गट नोंदणी केली असून यावेळी गटनेता म्हणून विजय सदाशिव औटी व उपगट नेता म्हणून सुरेखा अर्जुन भालेकर यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेलं संख्याबळ…
नवनिर्वाचित नगरसेवक :-
निता विजय औटी
नितीन अडसूळ,
विजय सदाशिव औटी,
सुप्रिया सुभाष शिंदे,
हिमानी बाळासाहेब नगरे,
डॉ. विद्या कावरे,
प्रियांका औटी
सुरेखा भालेकर – राष्ट्रवादीत प्रवेश
भूषण शेलार – राष्ट्रवादीत प्रवेश