Take a fresh look at your lifestyle.

Pune Bajar Samiti: 19 वर्षांची प्रशासकीय राजवट येणार संपुष्टात, ‘या’ तारखेला होणार मतदान; निवडणूक प्राधिकरणाने दिले आदेश..

0

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जीवनात बाजार समित्यांचे खूप जास्त महत्व आहे. शेतमालाला काय भाव मिळणार यामध्ये बाजार समितीचा मोठा हात असतो. महाराष्ट्रातील अनेक बाजार समित्यांपैकी सर्वात महत्वाची आणि दोन नंबरची बाजार समिती आहे, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती. नुकताच या बाजार समिती बाबत एक महत्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्रात मुंबईनंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू होणार असे दिसत आहे. याबाबतचे रीतसर आदेश शुक्रवारी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे आता पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 29 एप्रिल 2023 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीमुळे 19 वर्षांहून अधिक काळ असलेली बाजार समितीवरील प्रशासकीय राजवट आता संपुष्टात येईल अशी चिन्हे आहेत.

बाजार समितीतील आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहारामुळे मूळच्या हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन संचालक मंडळ 2003 मध्ये जिल्हा उपनिबंधकांनी बरखास्त केले होते. त्यानंतर मात्र राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी लोकनियुक्त संचालक मंडळ अस्तित्वात आणण्याऐवजी प्रशासक, प्रशासकीय मंडळ, पुन्हा प्रशासक राज आणून निवडणुका लांबविण्यातच सर्वांनी धन्यता मानली होती. मात्र आता या निवडणुकांमुळे ही प्रशासकीय राजवट एकदाची संपून बाजार समितीवर लोकनियुक्त संचालक मंडळ येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असे म्हणता येईल.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या बाबतीत मुंबई उच्च न्यायालयात यापूर्वीच याचिका दाखल करण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे ग्रामीण यांच्याकडून बाजार समितीची निवडणूक घेण्यासंदर्भात प्राधिकरणाकडून निर्णय घेण्यात येईल असे प्राधिकरणाने याचिकेतील सुनावणी वेळी सांगितले होते. न्यायालयाने आपल्या आदेशात ही बाब अधोरेखित केलेली आहे.

त्यासोबतच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोरील याचिका आणि इतर 43 संलग्न याचिकांमध्ये 5 जानेवारी 2023 रोजीचे आदेश पारीत करून राज्यातील निवडणुकीस पात्र सर्व बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया 30 एप्रिल 2023 पर्यंत किंवा त्यापूर्वी पूर्ण करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी बाजार समित्यांच्या निवडणुकांबाबत विविध उच्च न्यायालयांचे संदर्भ नमूद करत, त्या अनुषंगाने याबाबतचे आदेश दिले आहेत.

27 जानेवारी पर्यंत जिल्हा उपनिबंधक व गटविकास अधिकाऱ्यांकडून सदस्य सूची मागविणे, 31 जानेवारी पर्यंत प्रारूप मतदार यादी तयार करण्याकरिता सदस्य सूची बाजार समिती सचिवाकडे सुपूर्द करणे, यानंतर बाजार समिती सचिवाने नमुना 4 मध्ये प्रारूप मतदार यादी तयार करून ३१ जानेवारी ते १३ फेब्रुवारी पर्यंत ती पूर्ण करणे, 15 फेब्रुवारीपर्यंत बाजार समिती सचिवाने प्रारूप मतदार यादी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर केली पाहिजे, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी ती प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा शेवटचा दिनांक 20 फेब्रुवारी असणार आहे.

त्यावर काही आक्षेप वा हरकती असतील तर त्या 20 फेब्रुवारी ते 1 मार्च 2023 पर्यंत मागविण्यात येतील. जिल्हा निवडणूक अधिकारी याबाबतची अंतिम मतदार यादी 15 मार्च रोजी प्रसिद्ध करतील.

27 मार्चपासून निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार..

मिळालेल्या आदेशानुरूप निवडणूक अधिकारी 27 मार्च रोजी याबाबतच निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील. अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस 3 एप्रिल असणार आहे. दाखल करण्यात आलेले नामनिर्देशन, अर्जांच्या यादीच्या प्रसिद्धीचा दिनांक नामनिर्देशनासाठी निश्चित केलेल्या शेवटच्या दिनाकांपर्यंत जसजशी मिळतील त्याप्रमाणे राहील. अर्जांची छाननी 5 एप्रिलला तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस 20 एप्रिल असणार आहे.

21 एप्रिल रोजी याबाबतची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल व निशाण्यांचे वाटप होईल. अश्याप्रकारे बाजार समितीच्या संपूर्ण निवडणुकीचे वेळापत्रक असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.