शेतीशिवार टीम, 25 फेब्रुवारी 2022 : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्त्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. तुम्हाला माहिती आहे की आजही असे अनेक शेतकरी आहेत जे आपल्या शेतात डिझेल आणि इलेक्ट्रिक पंपाने सिंचन करतात, ज्यामध्ये ते खूप खर्च करतात कारण डिझेल पंप खूप महाग आहेत. तसेच सध्या नगरकरांच्या शेतीच्या वीज पुरवठयात अनियमितता असल्याचं आढळून येत आहे.
सध्या ग्रामीण भागात 24 तासातील बर्याचवेळा रात्रीच्या वेळी 2 ते 12 तासच बीज उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही समस्या लक्षात घेऊन आता अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांची ही समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या शेतात सिंचन करण्यासाठी सोलर पॉवर्ड पंप सिस्टीम उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा बँके अंतर्गत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या कर्ज योजनेतून शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होणार असून, त्यांना बाजारातून जास्त किमतीत पंप खरेदी करावे लागणार नाहीत. या सौरपंपांच्या उपस्थितीमुळे पर्यावरणाचे प्रदूषण होणार नाही…
बँकेचे अध्यक्ष उदय शेळके हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नगर तालुक्यातील आगडगाव विस्तार कक्षाच्या स्थलांतर प्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
जिल्हा बँकेने ग्रामिण भागातील शेतकर्यांची आर्थिक उन्नती केली असून बँकेने नुकतेच पीक कर्ज मर्यादा 30 हजार पर्यंत देण्याची शिफारस उच्च कमिटीकडे केली असल्याची माहिती बँकेचे जेष्ठ संचालक माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली आहे.
देशाला पर्यावरण संरक्षणाची गरज असून त्यादृष्टीने जिल्हयातील शेतकर्यांनी सोलर पॉवर्ड पंप सिस्टिम जिल्हा बँकेच्या योजनेचा फायदा घेण्याचे आवाहन कानवडे यांनी केले आहे.
परंतु या योजनेचा लाभ विकास सेवा सहकारी संस्थांमार्फत घेतलेल्या कर्जाची थकबाकी राहील्यास अशा शेतकर्यांना घेता येणार नसल्याचे उपाध्यक्ष अॅड. कानवडे यांनी सांगितले.
जिल्हा बँक 3 एचपी ते 10 एचपी पर्यत पंपाना 7 ते 10 वर्षाच्या परतफेड कालावधीकरीता ही योजना राबविणार आहे.
जिल्हा बँक सोलर पॉवर्ड पंप सिस्टीम योजनेसाठी कागदपत्रे :-
अर्जदाराचे आधार कार्ड
ओळखपत्र
निवास प्रमाणपत्र
शेतीची कागदपत्रे
जिल्हा बँक खाते पासबुक
मोबाईल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो
बँक स्टेटमेंट
अर्ज कसा कराल ?
अर्ज करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी तुम्ही जिल्हा बँकेशी किंवा तुमच्या भागातील संचालकांशी संपर्क साधा.