शेतकऱ्यांनो, 50,000 रुपये अनुदान हवं असेल तर ‘हे’ काम करण्यासाठी आजचं मुदत ; अन्यथा 5 सप्टेंबरच्या यादीत नाव येणार नाही !

0

शेतीशिवार टीम : 31 ऑगस्ट 2022 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत शासनाने जाहीर केलेल्या प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान देण्यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने कार्यवाही सुरू केली आहे.  या योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा बँकेचे 1 लाख 14 हजार 321 शेतकरी तर औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा बँकेचे 75 हजार तर राष्ट्रीयकृत बँकेचे 1 लाख शेतकरी पात्र ठरण्याची शक्यता असून त्यांना जवळपास 550 कोटी रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळण्याची शक्यता आहे. 

31 ऑगस्टपर्यंत सर्व याद्यांचे ऑडिट होऊन 10 सप्टेंबरपर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ही रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांनो, कर्जखात्याला आधार लिंक करणं गरजेचं….

या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचे कर्जखाते (Loan Account) 5 सप्टेंबरपूर्वी मोबाइल आणि आधारशी लिंक करावे लागणार आहे. लिंक नसलेल्या खात्यांची माहिती 5 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. मोबाइल आणि आधार लिंक असलेल्या शेतकऱ्यांच्याच खात्यावर 10 सप्टेंबर रोजी प्रोत्साहन रक्कम टाकली जाणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ मोबाइल क्रमांक आणि आधारकार्ड लिंक करून घ्यावेत तसेच बचत खाते क्रमांक, मोबाइल क्रमांक यांची माहिती विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, बँकेत द्यावी, असे आवाहनही राज्यातील जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.

टीप :- शेतकऱ्यांनो लिंकींगसाठी फक्त आजचाच दिवस उरला  असून लवकरात लवकर आपल्या बँक मॅनेजरशी / किंवा ATM च्या माध्यमातून ऑनलाईन लिंक करून घ्या. अन्यथा पात्र असूनही तुम्हाला यादीतून वगळलं जाऊ शकतं.

कोणाला आणि कसा मिळणार हा 50,000 रु. प्रोत्साहनपर लाभ….

सन 2017-18 ते 2019 – 20 या3 वर्षात घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीककर्जाच्या परतफेडीच्या देय दिनांकास अथवा 365 दिवस विचारात घेऊन पीककर्जाची मुद्दल व व्याजासह पूर्णतः परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मुद्दल रकमेवर 50 हजारांपर्यंतचा प्रोत्साहनपर रकमेचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने 29 जुलै रोजी जाहीर केला होता. हा लाभ देताना वैयक्तिक शेतकरी हा निकष विचारात घेण्यात येत आहे.

एक किंवा अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीककर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन बँकांनी प्रोत्साहनपर लाभाची रक्कम निश्चित करावयाची आहे. असे करताना 3 वर्षापैकी एक वर्षात कर्ज घेऊन त्याची विहित मुदतीत मुद्दल व व्याजासह पूर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांची माहिती विविध कार्यकारी संस्था किंवा बँकांनी भरावयीच आहे.

तसेच 3 वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षामध्ये घेतलेल्या पीककर्जाची पूर्णतः परतफेड केली असल्यास अशा शेतकऱ्यांचीही माहिती मागविण्यात आली आहे. 2019 मध्ये अतिवृष्टी व महापुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा लाभ मिळाला आहे, असे शेतकरी देखील या योजनेस पात्र राहणार आहेत.

या योजनेसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास 1 लाख 75 हजार शेतकरी पात्र ठरू शकणार आहेत. यात 75 हजार शेतकरी हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तर उर्वरित 1 लाख शेतकरी विविध राष्ट्रीयकृत बँकेचे आहेत. या शेतकऱ्यांना जवळपास 300 कोटी रुपये प्रोत्साहन अनुदान मिळण्याची शक्यता आहे.

31 ऑगस्टपर्यंत सर्व बँका, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांना याबाबतची माहिती गोळा करायची आहे. या योजनेसाठी राज्यात जवळपास 14 लाख शेतकरी पात्र ठरणार असून 4700 कोटी रुपयांची तरतूद शासनाने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.