भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आहेत. तरीसुद्धा देशातील अनेक ठिकाणी आजही रस्ते पोहचले नाहीत. कित्येक वर्षांपासून ठाणे-अहमदनगर हे शेजारी असलेले जिल्हे दळणवळणाच्या बाबतीत मात्र दूर होते. आता लवकरच हे जिल्हे रस्त्याच्या मार्गाने जोडून तब्बल 60 किमी लांबीचा वळसा दूर करण्यात येणार आहे. या नव्या मार्गाच्या निर्मितीनंतर 60 किमी चे अंतर 6 किमीवर येणार आहे.
त्यामुळे या घाटातलं अंतर फक्त 10 मिनिटात कापता येणार आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्यासाठी मागणी करणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि आदिवासींना बांधवांना दिलासा मिळाला आहे.
ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यातील गांढुळवाड, तळवाडा, हिंगळूद मेट ते चोंढे घाटमार्गे अहमदनगर जिल्ह्यातील घाटघरवाडी, भंडारदरा शेंडी, मुरशेत या भागाला थेट जोडणाऱ्या रस्त्याच्या उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रयत्न सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल 1 कोटी 75 लाखांचा खर्च करून या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया काढण्यात आली.
सध्या ठाणे जिल्ह्यातून नगर जिल्ह्यात जाण्यासाठी मुरबाडहून माळशेजमार्गे किंवा शहापूरहून कसारा घाटातून नाशिकमार्गे जावे लागते. शहापूरहून नाशिकमार्गे नगरकडे जाताना सध्या 60 किमीचा मोठा वळसा घालावा लागतो. त्यामुळे प्रवाश्यांचा मोठ्या प्रमाणात वेळेचा अपव्यय होतो, आणि प्रवासाचा खर्च देखील वाढतो.
असा उभारला जाणार पर्यायी मार्ग..
या मार्गाला पर्याय म्हणून शहापूर – शेणवा – डोळखांब – भंडारदरा – राजूर – अकोला – संगमनेर असा प्रस्तावित मार्ग उभारण्यात येणार आहे. या नव्या प्रस्तावित मार्गामुळे हे अंतर 6 किमीमध्ये पार करता येणार आहे.
सुमारे 20 वर्षांपासून स्थानिक लोकप्रतिनिधींकडून या रस्त्याच्या मागणीसाठी पाठपुरावा केला जात आहे. परंतु सरकारकडून याबाबतीत नेहमीच दुर्लक्ष करण्यात येत होते. यापूर्वी सन 2013-14 मध्ये या रस्त्याचे सरकारी स्तरावर सर्वेक्षण करण्यात आले होते. शहापूर ते अकोले अशा एकूण 120 किमीपैकी सुमारे 6 किमीचा मार्ग वनक्षेत्रातून जात असल्याने वन विभागाची जागा ताब्यात घेण्याबाबत राज्य सरकारकडून केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता.
कागदोपत्री दोन्ही जिल्ह्यांच्या बाजूंनी दिसणारा हा रस्ता चोंढे ते शहापूर व शेंडी ते घाटघर याठिकाणी अर्धवट स्थितीत आहे. घाटमाध्यावर जोडणीच्या कामामुळे हा रस्ता मार्गी लागण्यास उशीर होत आहे. यासंदर्भात स्थानिकांकडून पाठपुरावा केल्यानंतर आता गांडुळवाड, तळवाडा, हिंगळूद, मेट ते चोंढे घाटमार्गे नगर जिल्ह्यातील घाटघर, भंडारधरा शेंडी, मुरशेत या मार्गाचे अधिकाऱ्यांमार्फत सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणात व्यवहार्यता तपासण्याबरोबरच भूसंपादन प्रक्रिया, कोणत्याही पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात बाधा न आणता हा रस्ता पूर्ण करण्यासंदर्भातील कामांचा समावेश करण्यात येणार आहे.
पर्यटन विकासाला मिळणार मोठी चालना :-
चोंढे धरण, कोकणकड्याचे धबधबे, घाटघर धरण, सांधण व्हॅली, अलंग, कुलंग, कळसुबाई शिखर, भंडारदरा, अशा अनेक पर्यटनस्थळांकडे जाण्यासाठी हा रस्ता उपयुक्त ठरू शकणार आहे. मुंबई-ठाण्यातून पायी शिर्डीला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठीही हा मार्ग सोयीचा ठरणार आहे. सध्या ठाण्यावरून शिर्डीला पायी जाण्यासाठी 8 ते 9 दिवस लागतात.
या मार्गाचे काम पूर्ण झाल्यास केवळ पाच दिवसांमध्ये पोहोचणे शक्य होणार आहे. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने देखील हा मार्ग या भागासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, असे येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे यांनी आवर्जून सांगितले.