कल्याण-डोंबिवली-नवी मुंबई प्रवास होणार सुसाट! ‘हे’ 3 उड्डाणपुल 15 जानेवारीपासून होणार सुरू, तासाभराचा प्रवास करा फक्त 5 मिनिटांत..
कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध विकासकामांची कामे प्रगतीपथावर असून या नव्या प्रकल्पांमुळे कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या शहरातील वाहतूक कोंडी सुटणार आहे. नवी मुंबई आणि कल्याण येथील नागरिकांचा नवीन वर्षांतील प्रवास अधिक सुखकर होणार असून वाहतुकीचे सर्व अडथळे दूर होणार आहेत. तर ऐरोली, आणि कटई येथील बोगद्याच्या पूर्णत्वानंतर नवी मुंबई आणि कल्याण डाबिवली येथील 45 मिनिटांचे अंतर अवघ्या 5 ते 10 मिनिटांवर येणार असून प्रवास वेगवान हाणार आहे.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी सकाळी या महत्वाकांक्षी प्रकल्पांची पाहणी कली. रांजणोली नाक्यापासून या दौऱ्याला सुरुवात झाली. त्यानंतर पलावा जंक्शन येथे प्रगतीपथावर असलेल्या उड्डाणपुलाची त्यांनी पाहणी केली. यावेळी शिळफाटा उड्डाणपुलाचे प्रगतीपथावर असलेले काम लवकरच पूर्ण होणार असून त्यामुळे 15 जानेवारीपर्यंत यातील तीन मार्गिका प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत.
तर ऐरोली काटई उन्नत मार्गाची डाव्या बाजूची मार्गिका फेब्रुवारी अखेरीस सेवेत येणार आहे. या दोन पर्यायांमुळे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार आहे, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. तसेच शिळफाटा महापे या पाईपलाईन रस्त्यावर उपलब्ध जागत रस्त्याचे रूंदीकरण केले जाणार असून येथेही कोंडीमुक्त प्रवास करता येणार आहे. ज्यावेळी येथील उड्डाणपुलाचे काम सुरू होईल, तेव्हाही कोंडीमुक्त प्रवास करता येणार आहे.
गेल्या काही वर्षात शिळफाटा कल्याण रस्ता सहा पदरी केल्याने येथील वाहतुकीला खऱ्या अर्थाने वेग आला आहे. या भागातील वाहतूक अधिक वेगवान व्हावा, यासाठी येथे मुंब्रा वाय जंक्शन पुल उभारण्यात आला. येथेच ऐरोली – काटई उन्नत मार्ग, शिळफाटा उड्डाणपूल उभारला जात आहे.
बोगद्याचे कामही जवळपास पूर्ण..
काटई उन्नत मार्गावरील बोगद्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे मुंब्रा येथून थेट ठाणे – बेलापूर रस्त्यावर जाणे शक्य होणार आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबई ते काटई हे 45 मिनिटांचे अंतर केवळ 5 ते 10 मिनिटांचे होणार आहे. ऐरोली काटई उन्नत रस्त्याची एकूण लांबी 12.3 किमी आहे. पहिल्या टप्प्यात ठाणे – बेलापूर ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 पर्यंत एकूण 3.43 किमी लांबीचा असेल. आहे. या मार्गातील बोगदा 1.68 किमी लांब आहे.
या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना एमआयडीसीच्या दोन जलवाहिन्या बदलण्याचे काम सुरू आहे. तसेच लवकरच येथे उड्डाणपुलाचे काम सुरू होणार असून येथून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काय करता येईल ? याची पाहणीही यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठया प्रमाणावर जागा उपलब्ध असून त्या जागेवर डांबरीकरण केल्यास अतिरिक्त रस्ता उपलब्ध होणार आहे. त्यामुळे येथे कोंडीशिवाय प्रवास करता येणार आहे.
या रस्त्याच्या रूदीकरणाचे काम तातडीने हाती घेण्याच्या सूचना यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शिळफाटा ते कल्याण फाटा उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. सध्या याचे काम बहुतांशी पूर्ण झाले आहे. त्यामुळे या पुलाच्या तीन मार्गिका येत्या 15 जानेवारीला खुल्या होतील, अशी माहिती यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. याचवेळी त्यांनी ऐरोली काटई उन्नत मार्गाच्या बोगद्याच्या कामाचा आढावा घेतला. डाव्या बोगद्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून येथील विद्युतीकरणाचे काम तातडीने पूर्ण केले जाणार आहे.