शेतीशिवार टीम, 6 जानेवारी 2022 : जामखेड तालुक्यातील खर्डा येथे दाळमिळमध्ये गळ्यातील मफलर अडकून फास बसल्याने युवा उद्योजकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
रमेश ऊर्फ नाना सदाशिव वाळस्कर ( वय 22 ) या युवकाचे नाव आहे.
सविस्तर माहिती अशी की, खर्डा -जामखेड रस्त्यावरील गोलेकर लवणातील स्वतःच्या दाळमिळवर काम करत असताना मोटर अचानक चालू झाल्याने व त्यामध्ये गळ्यातील मफलर अडकून गळफास लागल्याने रमेश वाळस्कर या युवकाचा जागीच मृत्यू झाला.
जामखेड तालुक्यात सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या मोठी आहे. तालुक्यातील अनेक तरूण उद्योग व्यवसायाकडे वळू लागले आहे. हा तरुणही सुशिक्षित बेरोजगार काही महिन्यांपूर्वीच व्यवसायाकडे वळला असून अतिशय कष्टाळू युवक होता .
आईला शेतीसाठी मदत करणारा व स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी सतत धडपड करून नुकताच त्याने दाळमिळ व्यवसाय सुरू केला होता. अचानक त्याच्यावर काळाने घाला घातल्याने मृत्यू झाला.
या घटनेने खर्डा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. त्याच्यामागे आई, भाऊ, दोन बहिणी, भाऊजय, असा परिवार आहे. शांत स्वभावाच्या तरुण युवकाचा अचानक मृत्यू झाल्यामुळे खर्डा शहर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रमेशच्या दुर्दैवी मृत्यूमुळे खर्डा परिसर शोकसागरात बुडाला आहे.