केंद्र शासनाने मध्य भारताला दक्षिण पूर्व भागाशी थेट जोडण्याकरिता नागपूर ते विजयवाडा असा नवा 457 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग तयार करण्याची योजना आखली असून हा महामार्ग चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती आणि बल्लारपूर तालुक्यातून जाणार आहे.
या महामार्गावर चढण्यासाठी किंवा या महामार्गावरून उतरण्यासाठी वरोरा आणि चिमूर तालुक्यातील प्रवाशांकरिता वरोरा – विमूर मार्गावरील सालोरी नजिकच्या खातोडा येथे पॉइंट देण्यात येणार आहे. या महामार्गात जमीन जाणाऱ्या वरोरा तालुक्यातील संभाव्य शेत जमिनीचा ड्रोनद्वारे सर्व सुरू करण्यात आला आहे.
इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये भारत वेगाने प्रगती करीत आहे. त्याचेच एक पुढचे पाऊल म्हणून मध्य भारताला दक्षिण पूर्व भागाशी थेट जोडण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.
या निर्णयाच्या अनुषंगाने नागपूर ते विजयवाडा असा 457 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग तयार करण्याची योजना केंद्र शासनाने आखली आहे. या 457 किलोमीटरच्या महामार्ग बांधकामावर 14 हजार 666 कोटी रुपये खर्च होणार असल्याचे सांगितले जाते.
नागपूर ते विजयवाडा इकॉनोमिक करिडोअरचे काम एनएचएआय यांच्या देखरेखीखाली सुरू झाले असून, त्याला पाच टप्प्यात विभागण्यात आले आहे. यात 310 किलोमीटरचा ब्राऊनफिल्ड व 108 किलोमीटरचा ग्रीनफिल्ड तयार करण्यात येणार आहे. मंचेरियल ते वारंगल या दरम्यानच्या ग्रीनफिल्डवर 2500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या सर्व कामाचे डीपीआर तयार असल्याचे सांगितले.
हा एनएचएआयद्वारे महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश राज्यातून संरेखित केलेला चार पदरी रस्ता राहणार आहे. या कॉरिडॉरचे बांधकाम (ब्राऊनफिल्ड – अपग्रेड आणि ग्रीनफिल्डचे संयोजन) भारतमाला परियोजना फेज – 1 कार्यक्रमांतर्गत मालवाहतुकीची कार्यक्षमता सुधारणे आणि बंदर, कनेक्टिव्हिटीद्वारे निर्यातीला चालना देण्याचे प्राथमिक उद्दिष्ट ठेवून केले जात आहे.
सध्या नागपूर ते विजयवाडा पर्यंतचे अंतर आता 770 किलोमीटर असून, त्यासाठी अदिलाबाद – हैदराबादमागे जावे लागते, व हे अंतर कापायला साधारणत 13 तासांचा अवधी लागतो. परंतु, नागपूर ते विजयवाडा हा थेट एक्सप्रेस हाय – वे तयार झाल्यानंतर सदर अंतर 457 किलोमीटर राहणार असून ते पाच ते सहा तासात कापता येणार आहे.
दरम्यान , एनएचएआयने अद्याप प्रकल्पाचा तपशीलवार अहवाल (डीपीआर) ऑनलाइन उपलब्ध केलेला नाही. हा आर्थिक कॉरिडॉर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा महामार्ग चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती आणि पुढे बल्लारपूर या तालुक्यातून जाणार आहे.
ही माहिती मिळताच चंद्रपूर जिल्ह्यातील संबंधित विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी मर्जीतील दलालांना हाताशी धरून शेत जमिनी खरेदी करण्यासाठी लगबग सुरू केली आहे.
वरोरा तालुक्यातील हिरापुर, लोणार (धोटे) पुढे सालोरी – खाताडा, जामगाव यानंतर भद्रावती तालुक्यातील कोंढा, विजासन, चारगाव, कुणाडा या भागातून हा सदर रस्ता जाणार असल्याचे म्हटले जाते.
तसेच वरोरा आणि चिमूर येथील प्रवाशांकरिता सालोरी नजीकच्या खातोडा येथे चढण्या – उतरण्याचा पॉइंट दिला जाणार असल्याचे सांगितले जाते. यामुळे सदर मार्गात येणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकायच्या असल्यास त्या विकताना सावधानता बाळगण्याची गरज आहे.
एकूण अंदाजे खर्च : 14666 कोटी
प्रकल्पाची एकूण लांबी : 457 किमी .
टप्पे : 5
लेन : 4
अंतिम मुदत . 2027
मालक : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रोजेक्ट मॉडेल हायब्रीड अन्युइटी मोड..