पुन्हा अण्णा !, ठाकरे सरकारविरोधात अण्णा हजारे करणार आंदोलन
शेतीशिवार टीम, 19 ऑगस्ट 2021 :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे हे पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे संकेत आहेत. त्यांनी राळेगणसिद्धी येथे राज्यातील 27 जिल्ह्यांच्या प्रतिनिधीशी संवाद साधला.
भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाचे विश्वस्त व जिल्हा प्रतिनिधी यांची राळेगणसिद्धी येथे महत्वपूर्ण बैठक झाली. कोरोनाच्या परिस्थितीमुळे निवडक कार्यकर्त्यांना बोलावत व सर्व नियमांचे पालन करून बैठक पार पडल्याची माहिती माजी सरपंच लाभेष औटी यांनी म्हटलं आहे.
जवळपास ५ तास चाललेल्या बैठकीत राज्यातील विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली. वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती यावर कार्यकर्त्यांनी व्यापक समाजहिताच्या दृष्टीने योगदान देण्याचे आवाहन यावेळी हजारे यांनी कार्यकर्त्यांना केले.
यावेळी बोलताना हजारे म्हणाले की, सरकार कोणतेही असो जनहिताच्या प्रश्नांकडे सरकार डोळेझाक करत असेल तर त्याला जाणीव करून देण्यासाठी पुन्हा एकदा मोठे जनआंदोलन उभे करावे लागेल. त्यासाठी सामाजिक व राष्ट्रीय दृष्टिकोन असलेल्या समविचारी कार्यकर्त्यांचे संघटन उभे करावे लागेल. महाराष्ट्रात भ्रष्टाचार रोखण्यासाठी सक्षम लोकायुक्त होणे आवश्यक आहे. त्यासाठी एक संयुक्त मसुदा समिती कार्यरत आहे. मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी केवळ एक दोन बैठका बाकी आहेत. हा कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास आंदोलनाच्या तयारीत राहण्याचे आवाहन यावेळी हजारे यांनी कार्यकर्त्यांना केले.
यावेळी झालेल्या बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली. तसेच सरकारवर दबाव गट निर्माण करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यास्तर व तालुका स्तरावर संघटन बांधणीचा निर्णय घेण्यात आला. त्यासंबंधी काही कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली.
यावेळी जन आंदोलनाचे विश्वस्त डॉ. बालाजी कोंपलवार, अशोक सब्बन, शाम असावा, अल्लाउद्दीन शेख, ऍड. अजित देशमुख, संजय पठाडे, लाभेष औटी आदी उपस्थित होते.शिवाजी खेडकर, शाम पठाडे, संदिप पठारे, अन्सार शेख, रामदास सातकर, दत्ता आवारी आदींनी आजची बैठक यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर विश्वस्त मंडळाची बैठक झाली. या बैठकीत संघटन बांधणी साठी जिल्हावार व विभागानुसार दौरे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कोरोनाग्रस्त जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी ऑनलाइन बैठकीद्वारे संवाद साधण्याचे ठरले.