आनंदवार्ता ! महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन; पुढील 4 दिवस पुणे नगरसह ‘या’ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा..

0

यंदा मान्सून केरळमध्ये वेळेआधीच दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रातील कोकणात देखील गुरूवारी मान्सून दाखल झाला आहे. तळकोकणात ७ किंवा ८ जून रोजी मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र एक दिवस आधीच मान्सून दाखल झाल्यामुळे शेतकरी सुखावताना दिसून येत आहे..

राज्यात नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाल्याची अधिकृत माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे. नैऋत्य मोसमी पाऊस कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम -विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचल्याची माहिती – होसाळीकर यांनी दिली आहे.

गुरुवारी कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तर पुढील चार दिवस राज्यातील बहुतांश भागात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात देण्यात आला आहे.

आजपासून या जिल्ह्यांत पावसाचा इशारा..

दक्षिण कोकण, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज आणि उद्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी 8 जून रोजी आणि रविवारी 9 जून रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापुरात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

राज्याच्या अन्य भागांतही जोरदार पावसाची शक्यता आहे. रविवारपासून पुढील दोन दिवस मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह पश्चिम घाटात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भासह राज्याच्या बहुतेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. पुण्याला गेल्या दोन दिवसांपासून पावसाने झोडपले आहे. मंगळवार आणि बुधवारी पुण्यात झालेल्या पावसामुळे पुण्यातील बहुतांश रस्ते तुंबले होते. पुण्यात पुढील तीन दिवस दुपारी व संध्याकाळी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा इशारा..

मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस व मराठवाड्यात पुढील तीना दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण गोव्यात ८ व ९ तारखेला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात ८ तारखेला मुसळधार व ९ तारखेला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्ग येथे ८ व ९ तारखेला तर कोल्हापूर येथे ९ तारखेला तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकण गोव्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाट असेल ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.