महाअपडेट टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- विज बिलासाठी शेतकऱ्यांचे तोडलेले वीज कनेक्शन लवकरात लवकर जोडून वीज पुन्हा सुरळीत व्हावी व वीज बिल माफ व्हावे या मागणीसाठी भाजपचे नेते नेवास्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी टोकाला जात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.
बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आज नेवासा वीज वितरण कार्यालयासमोर 4 तास ठिय्या आंदोलन केले. परंतु 4 तास आंदोलन करूनही काही तोडगा निघत नसल्याने त्यांनी गळफास घेत आत्महत्येचा निर्णय घेतला.
परंतु तेथील भाजप पदाधिकारी, आंदोलक शेतकऱ्यांनी तात्काळ मुरकुटे यांना रोखल्याने मोठा अनर्थ टळला. सध्या बाळासाहेब मुरकुटे यांची प्रकृती ठीक असल्याचं सांगण्यात आलं आहे.
सध्या वीज बिल थकबाकीचा मुद्दा गंभीर बनला असून थकबाकी न भरल्यास शेतकऱ्यांचे कृषीपंपाची वीज कापली जात आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे.